हवा हवाई आणि इडली वाली ताई
हवा हवाई आणि इडली वाली ताई
#हवाहवाई #रियल_हिरो
फोटोत दिसत आहेत ना त्या ताईंच्या आयुष्यावर आधारलेला आहे हवाहवाई हा मराठी चित्रपट. आधारलेला याकरिता की सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून थोडाफार बदल निर्माते आपल्या पातळीवर करत असतात. ७ ऑक्टोबर २०२२ ला रिलीज झालेला महेश टिळेकर दिग्दर्शित आणि वर्षा उसगावकर यांच्या प्रमुख भूमिकेत एका मध्यमवर्गीय गृहिणीच्या आयुष्यातील अत्यंत प्रेरणादायी आणि रोचक घटना, प्रसंगावरील हा चित्रपट.
काही योगायोग विलक्षण असतात. आपल्या आजूबाजूला अगदी सामान्य वाटणाऱ्या माणसांच्या आयुष्यात सुद्धा काहीतरी विलक्षण घडलेलं असू शकतं याचा आपण विचारही केलेला नसतो. आपण संवाद साधला तर प्रत्येकाची एक कहाणी असतेच.
गेली चार वर्षे जेव्हा जेव्हा मी पुण्यात कुठल्याही प्रशिक्षणाच्या निमित्ताने येतो, तेव्हा सकाळी हमखास माझा आवडीचा नाश्ता करायला सदाशिव पेठेतील SCERT अतिथी भवनाच्या मागे असलेल्या गणपती मंदिराच्या चौकात अगदी रोडच्या कडेला इडली डोसा पोहेच्या गाडीवर नाश्ता करतो. एक छोटी छत्री साध्या दिसणाऱ्या टेबलावर उभारलेली गाडी आणि शाळकरी मुलं मुलींची, चाकर मान्यांची तुफान गर्दी. सर्व पदार्थांच्या चवीमध्ये अगदी घरगुती सुगरणीच्या हाताच्या चवीचा अनुभव. कधी कधी आठवडाभर सुद्धा राहायचं काम पडलं तर इथल्या इडली डोस्याने पोट बिघडलं नाही. त्यांना बघून त्या दोघी साऊथ इंडियन असाव्यात असा भ्रम माझा होता. खूपवेळा विचारावं असं वाटायचं पण गर्दी बघता त्यांच्या व्यवसायाला खीळ घालणं योग्य वाटायचं नाही.
यावेळी सुद्धा माझे मित्र सहकारी यांना घेऊन मुद्दाम तिथेच नाश्ता करायला आलो. सकाळची वेळ असल्याने कदाचित गर्दी कमी होती. सकाळीच गणपती बाप्पा बघून आम्ही मोर्चा इकडे वळवलेला.
"ताई तुमच्या कडचे इडली डोसे खूप छान असतात चवीला. तुम्ही मराठी आहात की दक्षिण भारतीय आहात?"
"नाही हो दादा, आम्ही मराठीच आहोत."
"अरे वाह…! तुमच्या गाडीबद्दल घरी माझ्या पत्नीशी नेहमी चर्चा करतो मी. तुम्ही घरातील सगळे सदस्य कशाप्रकारे मिळून मिसळून व्यवसाय करता. आणि हे करताना अगदी प्रसन्न मनाने अन्नपूर्णा म्हणून ग्राहकांना सेवा देता. हवा हवाई नावाचा एक मराठी चित्रपट आहे त्यात सेम तुमच्या सारखीच कथा मी बघितली आहे."
"अहो दादा, तुम्हाला विश्वास नाही बसणार…ती आमचीच कथा आहे आणि त्यात आमचा फोटो सुद्धा आहे…!! त्या वर्षा उसगावकर ताई आमच्या कडे येऊन गेल्या आहेत."
अगदी आनंदित होऊन त्या दोन्ही ताईंनी मोबाईल काढून लगेच फोटो आम्हाला दाखवला. हा आश्चर्य मिश्रित धक्का होता. कारण माझ्या सौ सोबत मी ही फिल्म काही दिवसांआधी घरी टिव्हीवर बघितली, तेव्हा ह्याच गाडीची मी आवर्जून आठवण काढली होती. मेहनतीने आणि आनंदाने जिद्द चिकाटीच्या जोरावर एखादी स्त्री आपल्या परिस्थितीवर कशी मात करू शकते याचे हे सुंदर उदाहरण.
"तुमची आकस्मिक अशी भेट होईल, आणि जिथे आपण नेहमी जातो त्या आपणच असाल असं वाटलच नाही.
एक सेल्फी काढुया का ताई?"
अतिशय आनंदाने माझ्या सर्व मित्र-मैत्रिणीसह आम्ही सेल्फी काढला. वेळ कमी होता आणि त्यांचाही व्यवसाय गर्दीचा असल्याने आम्ही पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन तिथून निघालो. संपूर्ण रस्ताभर त्यांचीच चर्चा आम्ही करत होतो. यावर काहीतरी लिहायचं हे मनात नक्की केलं होतं.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा नाश्ता करायला आल्यावर त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली. त्यांचा कारखाना आणि छोटेखानी दुकान बघितले. कशा प्रकारे पीठ तयार होतं, इडली साठी चे नवीन यंत्र आणि त्यांची सर्व टीमची माहिती घेतली.
"तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर कसलाही त्रासिक भाव नाही, किंवा कामाची लगबग घाई यामुळे येणारा ताण नाही. कसं काय हो ताई?"
"आम्हाला या कामात आनंद मिळतो. हे करताना आम्ही बाहेरचा एकही माणूस लावलेला नाही. ग्राहकांना सेवा देताना स्वतःच्या हाताने पदार्थ देण्यात समाधान वाटतं."
"आम्ही जावा जावा आहोत पण कधीही आमच्यात वाद, हेवा निर्माण होत नाही. लोकांना बहिणी बहिणी वाटतात. इथे लावलेल्या मशीन टप्याटप्याने घेतलेल्या आहेत. कसलही कर्ज न काढता, मिळवलेल्या नफ्यातून घेतलेल्या आहेत. एकावेळी एकच वस्तू घेतो, घाई करत नाही."
"पीठ मळण्याचा त्रास कमी व्हावा म्हणून एक मशीन आणलं. पुढे समोसा तयार करायला समोसा पट्टी मशीन घ्यायचं आहे. जागा १० बाय १० ची असली तरी आहेत त्याच भांडवलात आम्ही भागवतो."
त्यांच्या बोलण्यातून सोबतच्या काम करणाऱ्या बद्दलची काळजी, पुढील वाटचालीसाठीचे वास्तवावर आधारित नियोजन आणि छोट्या छोट्या यशातून आनंद घेत जाणं हे गुण लक्षात येत होते.
सोबतच्या सर्वांनी आतमध्ये जावून प्रत्यक्षात कसे काम चालते याची थोडक्यात माहिती घेतली. गंमत म्हणून स्वतः इडलीचे ट्रे सुद्धा लावून बघितले. सगळं भारवणारं होतं.
ताईंच्या चवदार इडली, डोसा, पोहे, उपमा यांची चव फक्त गाडी पुरती मर्यादित राहिलेली नाही. जवळजवळ २० दुकानांना त्या आता तयार माल पुरवतात. सकाळी 4 वाजेपासून कामाची सुरुवात होते, दुपारी 2 पर्यंत ही सगळी गडबड सुरू असते.
त्यांची कहाणी हवा हवाई या चित्रपटात तुम्हाला बघता येईल. गरीब, मध्यमवर्गीय असलो तरी स्वप्नांना कुठलेच बंधन नसते. आपल्या आजूबाजूला रोजगार नाही, नोकरी नाही म्हणून वैफल्यग्रस्त होऊन बसलेल्या तरुणांची केवढी गर्दी आहे. व्यवसाय करायला प्रचंड कर्ज किंवा भांडवल लागतं तसंच एकदम हटकेच व्यवसाय केला पाहिजे असं डोक्यात ठेवून तरुण पिढी रोजगार करतच नाही. केला तरी यशस्वी होत नाही. सुरुवातीच्या टप्यावर आलेल्या अपयशाने खचून जाते. अशावेळी आशाबाईं आणि मनीषा टेंभेकर बाईचे हे प्रयत्न खरंच बळ देणारे आहेत.
कुटुंबाची साथ असेल, मनात जिद्द असेल आणि आपण करतो त्या कामात आनंद मिळवत असू तर जगणं रुचकर होतंच. हो की नाही?
स्थळ - सप्तशृंगी केटरर्स आणि अजय स्नॅक्स सेंटर, सदाशिव पेठ पुणे
चित्रपटाचा ट्रेलर बघण्यासाठी लिंक
https://youtu.be/QGc1CMSq0JY?si=bpKKF5k_53jmCs6n
शब्दांकन - संदीप विष्णू राऊत
Labels: मराठी चित्रपट, रियल हिरो, हवाहवाई

0 Comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात .
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home