Thursday, January 4, 2024

संगणकाने बनवल्या कविता तर?

संगणकाने बनवल्या कविता तर? 

#हलकं_फुलकं
काय म्हणता? संगणक आणि कविता बनवेल? अहो त्याला कुठे भावना असतात? काल्पनिक वाटतं आहे ना? 
भावांनो आणि बहिणींनो तंत्रज्ञानाच्या युगात ज्या अशक्य वाटणाऱ्या कल्पना होत्या एकेकाळी त्या प्रत्यक्षात आलेल्या आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत. मग संगणक कविता, कथा किंवा एखादी रोमहर्षक कादंबरी लिहू शकणार नाही असं का आपल्याला वाटतं आहे? 

यावर गंमत म्हणून मी काही प्रयोग केले. मायक्रोसॉफ्ट बिंग या search engine वरती सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रायोगिक तत्त्वावर आपल्याला मोफत काही सेवा देत आहे. यामध्ये तुम्ही सुचवलेल्या कल्पना वापरून हवी तशी काल्पनिक इमेज तयार करता येते. तसेच योग्य सूचना देऊन तुम्ही एखादा निबंध, एखाद्या किचकट प्रश्नांची उत्तरे सोप्या आणि थोडक्यात मिळवू शकता. याचाच पुढचा भाग म्हणून मी काही कवितांचे प्रयोग केले. गझल, अभंग अशा वृत्तबद्ध कवितांची विनंती त्याला केली.

चक्क त्या ढाच्यात बसणाऱ्या कविता सदृश रचना त्याने तयार करून दिल्या. त्यात रचनेच्या दृष्टीने असलेली नियमावली बऱ्यापैकी पाळलेली होती. प्रेम या विषयाला धरून कविता बनव अशी सूचना असल्याने साधारणतः कोणते शब्द घ्यावेत यावर त्याने निवड केलेली होती. कविता खूपच आकर्षक नसली तरी एकदम वाह्यात सुद्धा नव्हती. मला तर खूप कौतुक वाटले, आणि लगोलग मनात भीतीही निर्माण झाली. यातून खूप सारे प्रश्न डोक्यात घोंगायला लागले.

सध्या असलेले हे weak intelligence पुढे पुढे strong होत जाईल. साहित्य प्रकारातील क्लासिक आणि गाजलेल्या साहित्य कृतींचा अभ्यास केल्यावर, त्याची तंत्रावरची हुकूमत वाढत जाईल. जगभरातील साहित्याचा data त्याच्या डोक्यात असल्याने साहित्याचे विविध प्रवाह आणि प्रकार, उपप्रकार त्यावरील समीक्षा, त्यावरील प्रबंध आणि रसग्रहण याचे सगळे संदर्भ त्याच्या हाताशी असतील. शब्दांची यादी, वर्गीकरण तयार असेल. कवितेचे software तयार असेल. ज्यात योग्य भावना, शब्द, प्रकार यांची सूचना दिल्यावर वेगवेगळया शैलीत आठ ते दहा प्रकारच्या कविता पर्याय म्हणून आपल्या समोर ठेवेल. 

शैलीनुसार मग AI घराणे तयार होतील. ही मानवी कृती नसल्याने त्याचे कॉपी राईट त्या AI आयडीच्या नावावर असतील. कुणाला कवितेसाठी अशी मदत लागली तर विशिष्ट अशी फी आकारली जाईल. एखादा गझलकार वृत्तात बसत नसणाऱ्या शब्दाने अडकला असेल तर अशा शब्दांची यादी तो लगेच उपलब्ध करून देईल. किंवा आपला शेर मीटर मध्ये आहे की नाही ते सुद्धा तो सुचवेल. आपण लिहितो आहोत तो शेर, खयाल यापूर्वी कुणी मांडला आहे का? हे सुद्धा तो सांगेल. 

साहित्य संमेलनाला एखादे दालन कृत्रिम बुद्धिमत्ता कविता, किंवा कथा याबद्दल ठेवावे लागेल. साहित्यिकांना आपल्या साहित्य कृतीच्या पहिल्या पानावर disclaimer लिहून सांगावे लागेल की संबंधित कृती ह्या कुठल्याही कृत्रिम बुद्धिमत्ता software चा उपयोग न करता तयार केलेल्या आहेत. त्यातून वाङमय चौर्याच्या नवीन घटना बघायला मिळतील. कायदे नव्याने तयार करावे लागतील.

साहित्य कृती या मानवी बुद्धिमत्ता, चिंतन, अनुभव आणि अचेतन मनातून नकळत तर कधी कौशल्यपूर्वक तयार होतात. लेखकाचा परिसर, भावविश्व, त्याची झालेली जडणघडण, वाचन आणि कळत नकळत झालेले संस्कार अशी विविध घटकातून त्याची शैली तयार होत जाते. वयानुसार परिपक्व होत होत लिखाण सुद्धा परिपक्व होत जाते. या सगळ्या प्रकारच्या गोष्टी एखाद्या कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या संगणकात कितपत येऊ शकणार आहेत? पण त्याचवेळी हेही तेवढंच खरं आहे की तंत्रज्ञान ज्या वेगाने बदलते आहे त्याची शक्ती ज्या पटीने वाढते आहे त्याचा हस्तक्षेप साहित्य क्षेत्रात होणार आहेच. सकारात्मक अंगाने विचार केल्यास कदाचित साहित्यिकाला अधिक समृद्ध करायला त्याची मदत होईल. उत्तमोत्तम साहित्य संदर्भ, व्याकरण, तंत्रशुद्ध लिखाणाला मदत होईल. एवढे प्रचंड प्रमाणात विखुरल्या गेलेले लिखाण कदाचित एकाच प्लॅटफॉर्म वरती हाताच्या बोटांवर उपलब्ध होईल. 

सध्या तरी गंमत म्हणून आपणही या कृत्रिम बुद्धिमत्तेला काही मजेदार कविता तयार करायला सांगू शकता. त्याने तयार केलेल्या कविता प्रतिक्रियेत टाकायला हरकत नाही. 

© संदीप विष्णू राऊत, बुलढाणा
raaut.sandip@gmail.com
05.01.2024

Labels: , ,

Tuesday, November 21, 2023

दातात अडकून पडलेला मी

दातात अडकून पडलेला मी
#हलकं_फुलकं 

कुणी मृत्यूच्या दाढेत अडकून पडलं, कुणाच्या दाढेतून कुणाची सुटका झाली. अशी वाक्य आपण नेहमी ऐकतो, पण स्वतःच्या दातात अडकून पडल्याचं ऐकलं आहे कधी? 
त्याचं असं झालं की मी माझ्या कामावर होतो. काम करताना सहकारी ताईने मस्त चिवडा, फरसाण खायला दिले. खाऊन झाले, पाणी पिऊन झाले आणि मी माझ्या कामात व्यस्त झालो. काम करता करता मागच्या दाढेमध्ये काहीतरी अडकलं याची जाणीव झाली. तोंड अंतर्गत मामला शक्यतो तोंडातर्गत विभागात सोडवायची सवय असल्याने जिभेने तो कण काढण्याचे प्रयत्न सुरू केले. वरच्या भागातून तर कधी खालच्या भागातून जिभेने अतोनात प्रयत्न करून दाढेतल्या कणाला काढण्याचा प्रयत्न केला. दाढेला समजत होतं नेमका कण कुठे आहे, पण जिभेच्या हाताशी काही लागत नव्हतं. तोंड वेडंवाकडं करून खूप प्रकारे जिभेने प्रयत्न करून जीभ लालेलाल झाली. 

कामात लक्ष लागेना. एवढासा काय तो कण, त्याची काय बिशाद. असा अहंकार उफाळून आल्याने, तोंड विभागाचे काम बोट विभागाकडे सुपूर्द झाले. बोटांनी इमाने इतबारे नेमक्या कुठल्या दाढेत कण अडकून पडला आहे याची सखोल चौकशी करायला सुरुवात केली. दाढ विभागाला कळत होतं की नेमकं दुखणं कुठे आहे पण बोट विभागला ते नीट सांगता येत नव्हतं. मेंदूचा प्रयत्न जोरदार सुरू होता अचूक दिशा निर्देश करण्याचा पण दोन विभागात ताळमेळ बसत नव्हता. बोटांनी हाताळलं की तिथे काहीच लागत नव्हतं, पण दाढ सारखी म्हणत होती काहीतरी अडकलं आहे हे निश्चित.

त्यात काय एवढं, निघेल हळू हळू म्हणून हात विभागाने चालढकल केली. पण दाढेला कुठं कळतंय, तिला सतत टोचणी लागलेली होतीच. लिहायला घेतलं तर हातातल्या पेनाच्या अनुकुचीदार टोकामध्ये कण काढायची उर्मी निर्माण झाली. मग काय खटका दाबून शक्य तेवढ्या आत पेन घालून दाढेच्या कणावर आक्रमण सुरू केलं. पण तोंडाला काळी शाई आणि जिभेला तुरट कडवट चव लागणे सोडले तर हाती काही लागलं नाही. या प्रयत्नात आजूबाजूच्या सहकाऱ्यांनी याचं काहीतरी बिनसलं आहे की काय, की डोक्यात फरक पडला की काय असं समजून माझ्याकडे बघायला सुरुवात केलेली होती.

त्यांच्या नजरा चोरत उगाच काहीतरी निमित्त काढून मी बाहेर पडलो. कण खरं म्हणजे दातात कमी डोक्यात जास्त अडकून पडला होता. बाहेर कडुनिंबाचे झाड दिसले. डोक्यात प्रकाश पडला. त्यातली वाळलेली फांदी पाहून त्याची टोकदार काडी तोडली. नैसर्गिक टूथपिक वापरले पाहिजे. त्यात कुठलं तरी व्हिटॅमिन झी का काय असतं म्हणे. त्यामुळे दातात कीड राहत नाही आणि दातही स्वच्छ होतात. कडुनिंबाच्या काडीचे फायदे अशी डोक्यात काडी वळवळली. मस्त पैकी त्या काडीने बाकीच्या फटीतला सगळं प्लाक काढला. दाढेत नेमका कण शोधून काढण्याच्या प्रयत्नात काडी मोडली. मला जरा रागच आला. एवढी काय ती मिजास या कणाची. माझं धारदार हत्यार चक्क मोडलं. दुसरी काडी तोडायला गेलो तोवर लक्षात आलं की निंबाच्या काडीचा एक बारीक तुकडा सुद्धा त्याच दाढेत अडकून बसला आहे. 

आता एका समस्येबाबत दुसरी समस्या निर्माण झाली. आता त्या कणाचं फारसं दुःख वाटेनासं झालं, पण आपणच अडकवलेली की केलेली म्हणा हवं तर काडी कशी काढायची यावर गहन चिंतन सुरू झालं. आपली रणनीती मुळात चुकली हे उशिरा लक्षात आलं. दातात अडकलेले कण काढायला अतिशय मजबूत हत्यार पाहिजे. महिला भगिनिकडे हमखास असणारी गोष्ट म्हणजे सेफ्टी पिन. ताईंना अदबीने माझी अडचण सांगून एक सेफ्टी पिन मागवली. पोटभर पाणी पिऊन आणि समोरच्या कामाला बाजूला सारून मोठ्या आत्मविश्वासाने खुर्चीवर बसून मी सेफ्टी पिनाने दातातला अन्नकण काढायला सुरुवात केली. वेगवेगळया दिशेने प्रयत्न केल्याने यश हमखास वैगेरे लाभते असं कुणीतरी सांगून वैगेरे ठेवलं आहे म्हणतात. तसं मी चित्त एकाग्र करून डोळे बंद करून समाधिस्त अवस्थेत अन्नकण काढायला भिडलो. हाताशी लागलं म्हणता म्हणता यश हुलकावणी घालत होतं. कणाच्या आजूबाजूला दाढ खरवडून झाली, पण बच्चम जी खोलवर रुतून बसलेला होता.

दातात कसली तरी वेगळीच चव लागायला लागली. मी जरा घाबरलो, म्हटलं रक्त वैगेरे तर नाही? हो त्या पिनेने टोचून टोचून हिरड्या मधून रक्त यायला लागलं होतं. मी सगळा खटाटोप बाजूला ठेवला, आधी नळावर जावून गुळण्या करायला सुरुवात केली. हा अघोरी उपाय करणे चुकले हे लक्षात यायला लागले होते. एव्हाना घरी निघण्याची वेळ झाली होती. अर्धवट सोडून मी काम निपटायला घेतली. अर्थात डोक्यातली टक जाता जात नव्हती. फायबर शरीराला आवश्यक असतात म्हणे, डोंबलाचा….
हा कसला फायबर दाताच्या फटीत अडकून पडला कोण जाणे. 

आरश्यासमोर उभे राहून वेड वाकडं तोंड करून कधी जिभेने, कधी बोटाने, तर कधी मोबाईलच्या उजेडात समस्या नेमकी कुठे दडून बसली आहे याचा शोध घेणे सुरू केले. दात खूप पिवळे दिसतात आपले. पांढरे शुभ्र होण्यासाठी आयुर्वेदिक आणि कसल्या भारी ब्रँडचा पेस्ट आणून बघितला. पण आपले पिवळे दात दिसायचे कुठले थांबायचे. रोज झोपण्या आधी आणि सकाळी उठल्यावर दात स्वच्छ धुतले पाहिजे, याची आठवण झाली. डॉक्टर सुद्धा झोपण्याआधी दात स्वच्छ धुवून झोपत असतील का? भोळा भाबडा प्रश्न मलाही पडला. यूट्यूब वर दातातील कण कसा काढायचा यावर व्हिडिओ बघितला. त्यातल्या काही gadget ची नाव नोंदवून घेतली. दोरीने हळूच दाताच्या फटीतला कण काढायची युक्ती मला जाम आवडली. आपण उगाच श्रम घेतले. 

छान पांढऱ्या शुभ्र धाग्यातील बिंडल मधला तुकडा घेऊन आरश्यासमोर उभे राहून मी प्रयोगाला सुरुवात केली. अधेमधे बायको पोरं पप्पा हे काय विचित्र करत आहेत, म्हणून हसत बघत होती. पण मी गंभीर असल्याने, कुणी छेडायला तयार नव्हतं. धागा आत घुसला आणि हाय देवा…तुटला आणि त्याचा एक तुकडा त्याच दाढेत अडकून पडला. माझी चिडचिड झाली. सगळा राग त्या बिंडलावर काढून, आजकाल भ्रष्टाचार किती खोल रुजला आहे यावर बायकोला एक लेकचर वैगेरे देऊन टाकले. धागे मजबूत कसे असायला हवे यावर माझे मत वैगेरे नोंदवले. बायको जवळ येऊन हळूच म्हणाली, अहो एवढं डोकं लावत बसण्यापेक्षा डेंटिस्ट कडे जावून या ना. उगाच इजा करून घ्याल. 

स्वतःच्या गळून पडलेल्या अहंकाराने मलूल होऊन मी नाईलाजाने डेंटिस्ट कडे जाण्याचा निर्णय घेतला. कॉल करून अपॉइंटमेंट घेतली. तिथे ही तोबा गर्दी. माझा नंबर यायला तासभर तरी अवकाश होता. धागा, काडी आणि बहाद्दर अन्नकण तिघांच्या युतीने मी नामोहरम झालेला होतो. अशावेळी वाट बघायची वेळ युगांसरखी का भासू लागते माहित नाही. म्हातारे, तरुण, स्त्री पुरुष सगळ्यांचे काहीना काहीतरी प्रोब्लेम. त्यांच्या दुःखाच्या पुढे आपलं दुःख किती क्षुद्र आहे याची आध्यात्मिक जाणीव वैगेरे मला व्हायला लागली. दुःखाकडे बघताना आपण आजूबाजूला असलेल्या सुखाकडे कानाडोळा वैगेरे करतो. आयुष्य क्षण भंगुर वैगेरे वैगेरे आहे याची प्रखर जाणीव मला व्हायला लागली. 

दोन पेशंट राहिले, एवढा काय वेळ लागतो डॉक्टरांना. प्रत्येकाला एवढं काळजीपूर्वक तपासतात. काही गरज नसते, असे स्वार्थी वैगरे विचार डोक्याला यायला लागले. एखादा पेशंट कमी झाला असता तर किमान दहा मिनिटे वाचले असते. वैगेरे वैगेरे…माझं नाव यायचंच. एवढ्यात चमत्कार झाला. लाळ पिऊन पिऊन का काय माहित पण अन्नकण फुगून बाहेर पडला. अर्थात त्यामुळे फट जरा मोठी होऊन धागा काडी हळूच जिभेने बाहेर निघाली. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. 

आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदचि अंग आनंदाचे 

एवढा आनंद मला लग्न झाल्यावर सुद्धा झाला नव्हता. डॉक्टरांकडे जाण्याचे पैसे वाचले होते. लगेच रांगेतून बाहेर येत. मी गाडीला किक मारली. रस्त्याने डोक्यात आलं, खरंच सगळ्या समस्या सोडवत बसलं पाहिजे असं नाही. काही समस्या वेळ काळ आला की आपोआप सुटतात. आपण आपल्या डोक्यात सुद्धा असाच एखादा कण अडकून ठेवतो. असे महान वैगेरे विचार डोक्यात घेऊन घरी आलो. 

जेवण करताना बायकोला सगळा किस्सा आनंदाने सांगत बसलो. जेवण झालं. बेडवर अंग टाकलं, आणि घात झाला…आजच्या भाजीतला पालक फायबर नेमका तिथेच अडकून बसला…..!!

शब्दांकन - संदीप विष्णू राऊत
२२.११.२०२३
raaut.sandip@gmail.com

Labels: , ,

Thursday, November 9, 2023

धमाल मस्ती आणि आनंदच आनंद

#बोलगप्पा_दैनंदिनी 
धमाल मस्ती आणि आनंदच आनंद 
लेख क्रमांक १५

गेली चार दिवस शाळेत वेगवेगळया स्वरूपात मुलांसोबत दिवाळी पूर्व उपक्रमांची रेलचेल सुरू आहे. सुरुवात अनपेक्षितपणे झाली. प्रथम सत्रातील संकलित चाचण्या आणि त्या चाचण्यांचा अभ्यास या गंभीर गोष्टींमुळे मुळे काहीशी गंभीर झालेली होती. त्यात योगायोगाने एकेदिवशी शाळेत कमी शिक्षक आणि मुख्याध्यापकांना अतिशय तातडीचे प्रशासकीय काम आलेले होते. पाच वर्गांना एकत्रित सांभाळायचे होते. सोबतच्या सहकारी शिक्षिकेला प्रश्न पडला आता काय करायचं? मी म्हटलं ही तर संधी आहे. तसेही दिवाळी जवळ आलेली होती. म्हटलं आज आपण आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा घेऊया. 

पहिली अडचण अशी की रंगीत कागद नव्हते, गावात दुकानावर मिळणार सुद्धा नव्हते. बाकी साहित्य माझ्याकडे होतेच. म्हटलं नो प्रोब्लेम. एका मुलाला पाठवून तीन चार पूर्ण आकाराची वर्तमानपत्र रद्दी मिळवली. बाहेर मस्त पैकी सतरंजी अंथरली आणि छोटा टेबल लावून ओरिगामी मधील आधी साध्या घड्या शिकवल्या. त्याचा सराव झाल्यावर टप्याटप्याने दोन प्रकारचे आकाश कंदील बनवून दाखवले. सोबत सोबत मुलांनी सुद्धा प्रयत्न करून बघितले. दुसऱ्या दिवशी येताना सगळ्यांना आव्हान दिले की वेगवेगळ्या प्रकारे आकाश कंदील बनवून आणा. आवश्यक तेथे मोठ्यांची मदत घ्या. सजावट करून आणा. 

दुसऱ्या दिवशी योगायोगाने मी जरा लवकर आलेलो होतो. मुले आकाश कंदील घेऊन आलेली होती. मी थक्क झालो, किती अप्रतिम आकाश कंदील बनवलेले होते. कुणी टिकल्या, कुणी डाळ, कुणी तेलखडू, कुणी अगदी वहीचे कागद, रंगीत चिकट पट्ट्या, रंग इत्यादी कल्पकतेने वापरून सजावट केलेली होती. बाहेरच्या व्हरांड्यात मी सगळे लटकवून ठेवले. सगळे येताच पाहून खूश झाले. परिपाठात शाब्बासकी देऊन त्यांचं कौतुक केलं. 

त्यानंतर आज रंगीत ड्रेस, रांगोळी स्पर्धा, गोडधोड फराळ, आणि शेवटी चेरी ऑन टॉप...समूह नृत्य असा भरगच्च कार्यक्रम ठेवलेला होता. सर्व सहकारी मंडळींनी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उत्साही सहभागातून एकसे एक सुंदर रांगोळ्या, खूप सारे फोटो, व्हिडिओ, मध्यान्ह भोजन दरम्यान गरमागरम जिलेबी, दिवाळी बद्दल पोटभर गप्पा, संवाद साधला. सायंकाळी वयानुरूप समूह करून समूह नृत्य उर्फ डान्स घेतला. 

मराठी शाळांमध्ये येणारी मुलं वेगवेगळया आर्थिक, सामाजिक गटातून येतात. प्रत्येकाला किती उत्सव साजरा करायला मिळतो माहित नाही. शिक्षक मुख्याध्यापक यांच्या सोबत एक छान नातं तयार व्हायला, बुजरेपणा कमी व्हायला आणि मनसोक्त व्यक्त व्हायला असे शैक्षणिक उत्सव खूप मदत करतात. शालेय जीवनातील तोचतोचपणा यातून कमी होऊन उत्साह नव्याने संचारतो. भावनिक, सामाजिक आणि सांस्कृतिक भूक काही प्रमाणात भागवता येते. 

शब्दांकन - © संदीप विष्णू राऊत
raaut.sandip@gmail.com

Labels: , ,

Saturday, October 28, 2023

रसरसून जगण्याचे किती बहाणे

रसरसून जगण्याचे किती बहाणे 
#हलकं_फुलकं 

पहाटे उठल्यावर एखाद्या निर्मनुष्य रस्त्यावर फिरताना पक्ष्यांचा किलबिलाट आणि कोकिळेचा मधुर आवाज ऐकायला आला, आजूबाजूला आपल्या अंगभूत सौंदर्याने नटलेल्या गवतांचे भुरभुरणारे जावळ आणि त्यावरची बिनधास्त डोलणारी गवतफुले बघितली की जगण्याची लालसा कशी उचंबळून येते. अगदी दुर्लक्षित असलेल्या शेताच्या बांधावर, पडक्या भिंतीवर, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात उमलून आलेली सदाफुलीची, रानफुलांची फुलं, हिरव्यागार वेली, माहित नसलेल्या कसल्या कसल्या जातीची फुलं जेव्हा उस्फूर्तपणे त्या विद्रूप जगाचे बगीच्यात रूपांतर करतात ते बघून जगण्याच्या ओझ्यातून मन मोकळं होतं.

निराशा दाटून आली की उगवलेला सूर्य सुद्धा मलूल वाटत असतो. तेव्हाच एखादी महम्मद रफी, किशोर किंवा मुकेशची एखादी लकेर कुठल्याश्या रेडिओ वर ऐकायला मिळते, आणि जगणं त्या क्षणापुरतं थांबून जातं. त्या अवस्थेत तिथेच कानाची मैफिल सजते. काळवेळ, स्थळाचे भान सुटते आणि तरुण किशोर वयाची एखादी गार वाऱ्याची झुळूक भूतकाळात घेऊन जाते. एखादी गुलाम अली ची गझल आपल्या भोवती वाह वाहची दाद देणारी दर्दी गर्दीचा आभास निर्माण करते. लता दीदीचे स्वर, आशा भोसले यांच्या आवाजात "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या"  सारखी लकेर जगायची उत्कट उर्मी निर्माण करते. किती सुरेल जग आहे हे संगीताचे. एका जन्मात ऐकतो म्हटलं तरीही गाण्यांचे हे अफाट मायाजाल भोगायला आयुष्य थिटे आहे. उत्तमोत्तम रागदारी, गझला, शेर, अभंग, ओव्या, भावगीतं, पोवाडे, अंगावर काटे आणणारी भीमगीतं... जात्यावरची गाणी, भुलाबाईची गाणी, भारुड, कीर्तन, कव्वाल्या, भक्तिगीतं, वाद्य संगीत....

जगायला मोठी मोठी स्वप्न, मोठ्या मोठ्या महत्त्वाकांक्षा हव्याच असं काही नसतं. आनंदी जगायला अगदी छोट्या छोट्या गोष्टी पुरेशा ठरतात. आपल्या आजूबाजूला असणारी ही माणसं आपल्या अंतरंगात किती मोठं जग साठवून असतात. त्यांच्याशी बोलायला गेलो तर ऐकता ऐकता आपलं दुःख गळून जातं. आपला अहं कमी होतो. एखाद्या ध्येयासाठी, सेवेसाठी झपाटून काम करणारी माणसं स्वतः साठी जगत नाहीत. दुसऱ्याला देण्यात, सेवेत त्यांना सुख लाभतं. त्यांची चरित्रे समजून घेण्यात केवढं सुख आहे. 

कागदावर रंग रेषांची आणि त्यातल्या कॅनव्हास चौकटीत अख्ख भावविश्व चितारणाऱ्या चित्रकाराची कला प्रत्यक्ष चित्र काढताना अनुभवली आहे का? सृजनाची त्याची प्रक्रिया बघणाऱ्याला आणि चित्र रेखाटणाऱ्या दोघांना ही प्रचंड आनंद देणारी प्रक्रिया असते. एवढं अनंत आकाश जेव्हा एखादा कुंचला कागदावर उतरवत असतो तेव्हा त्या कलेने जगण्याचा रंग तकाकी आणतो. उत्तम चित्रकाराची चित्र प्रदर्शनी बघण्यात, स्वतः जमेल तसं चित्र रेखाटण्यात रंगवण्यात किती आनंद भरून उरला आहे. तैल चित्र, जलरंग, ॲक्रालीक, पोस्टर रंग, पेन्सिल पेनाचं साधं अचूक गिरगिटणं, नेमकी व्यंगाची उणीव शोधून तेवढी व्यंगचित्रात उतरवणं. अगदी मार्मिक टिप्पणी करून वाचकांकडून दाद घेणं यात किती रस भरून उरला आहे.

माणसाचं आयुष्य हा निसर्गाचा गोड अपघात आहे. त्याला न भोगता आत्महत्या करणं, त्याला वाळवी लागल्यासारखं पोखरू देणं, उदासवाणं आणि पंचंद्रिये आकसून घेणं कितपत योग्य आहे? पुस्तके वाचायची आणि त्यातला आनंद लुटायचा म्हटलं तरी आयुष्य अपुरं पडतं. एका एका पुस्तकातून काळाचा, व्यक्तींचा, प्रदेशाचा, जात धर्माचा,  कुठल्या कुठल्या आयामांचा केवढा धांडोळा घेता येतो. किती भरभरून जगणाऱ्या लोकांना भेटता येतं? वेदनांशी नाळ जोडता येते, अशक्य स्वरूपात सुद्धा जगण्याच्या वाटा धुंडाळता येतात. कविता, ललित, नाटकं, आत्मचरित्र, कथा, प्रवास वर्णने....किती किती सुरेख मोहमयी दुनिया आहे ही.

रोजच्या खाण्यापिण्यात असलेल्या खाद्य पदार्थात एक अख्खं आयुष्य देता येईल एवढी प्रचंड विविधता आहे. जिभेचे चोचले पुरवणारी ग्रामीण, शहरी, आदिवासी, डोंगरी भागातली खाद्य विविधता. राज्याराज्यातील, देशादेशातील चवीची ही अजब दुनिया जगायला भुरळ पाडत नाही का? खाद्य पदार्थ बनवणे, खिलवणे आणि एखाद्याने बनवलेल्या खाद्य पदार्थांचे कौतुक करण्यात केवढी जगण्याची आसक्ती ठासून भरलेली आहे. माणूस चारा खाणारा प्राणी नाही, त्याला पदार्थ डोळ्यांनी, नाकांनी आणि शेवटी जिभेनी आस्वाद घेत घेत खायला आवडतं. 

संवेदनशील छायाचित्रण करताना मनाला केवढा आनंद मिळतो. माणसांची, प्रसंगांची, शहराची, फुलांची, निसर्गाची, प्राण्यांची, पक्ष्यांची, कीटकांची एकेक स्वतंत्र दुनिया आणि त्यांचे स्वतंत्र अस्तित्व कॅमेऱ्याचा डोळ्यातून बघताना स्तिमित व्हायला होतं. ऊन सावल्यांचा खेळ, पाऊस, वारा आणि डोंगर दऱ्या, प्रचंड विविधता असणारी झाड झुडपं, रोज रोज बदलणारं गूढ आकाश, समुद्र, नद्या आणि जमिनीवर तयार झालेली अद्भुत रचना. हे टिपताना एक आयुष्य कसं पुरेल? 

जगायला अजून किती बहाणे हवे? सुताराच्या कामात, कुंभाराच्या चाकावर, गवंडीच्या रचनेत, शेतातल्या बहरणाऱ्या पिकांवर, शिंप्याच्या वेल बुट्टीवर, पाणी पुरी विकणाऱ्याच्या शेव पुरीवर, जत्रेत बासुरीचे सुर काढत बासरी विकणाऱ्या त्या पोटावर....जगण्याचा केवढा आनंद भरून उरला आहे. हातपाय तुटलेले असूनही जगण्यावर प्रेम करणारा जीव, डोळे आंधळे असूनही कानातून स्पर्शातून जग साठवून ठेवणारा जीव, जगण्याची कसलीही साधने नसलेला रस्त्याच्या कडेला झोपलेला जीव आपल्याला काय सांगतो आहे? रसरसून जग, भरभरून जग. जगायला छोटंसं निमित्त पुरेसं असताना सगळं सौंदर्य भरून असलेलं जग हात जोडून तुझी वाट बघतंय. 

स्वतः साठी जग, इतरांसाठी जग, बेंबीच्या देठापासून जग. आनंदाने साजरा कर हरेक दिवस. कला, छंद, समाज कार्य, कार्य क्षेत्रातला आनंद आणि छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याची दृष्टी एकदा मिळाली तर जगणं एक उत्सव होऊन जाईल.

© संदीप विष्णू राऊत
- raaut.sandip@gmail.com
- 29.10.2023

Labels: