Sunday, January 22, 2017

तणाव व्यवस्थापन आणि आरोग्य

डॉ. यश वेलणकर  •April 19, 2016  
तणाव व्यवस्थापन आणि आरोग्य

आहार, विहार आणि विचार यांच्या सवयी म्हणजे जीवनशैली होय. विहार म्हणजे रोजची दिनचर्या. यामध्ये योग्य व्यायामाचा अंतर्भाव केल्याने हृदयात नवीन रक्तवाहिन्या तयार होतात, पण केवळ व्यायाम पुरेसा नाही. नियमित व्यायाम करणारा माणूसदेखील सारखी चिडचिड करत राहिला, तर त्याच्या रक्तवाहिनीतील अडथळे वाढतातच, पण रक्ताची गुठळी होण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे आहार आणि विहाराबरोबरच विचारांच्या सवयी बदलणेही आवश्यक असते. त्यासाठी अमेरिकेतील सुप्रसिद्ध डॉ. डीन ऑर्निश यांनी त्यांच्या रिव्हर्सिंग हार्ट डिसीज या संशोधन प्रोग्राम मध्ये ध्यान आणि समुपदेशन यांचा उपयोग केला होता.
हृदयरोग होऊ द्यायचा नसेल तर चुकीची जीवनशैली बदलायला हवी पण एकदा हृदयरोग झाला, अँन्जिओग्राफी मध्ये हृदयात ब्लॉकेजेस आढळले कि अँन्जिओप्लास्टी किंवा बायपास ऑपरेशन्स करायलाच हवीत, त्याला पर्याय नाही असे अनेक डॉक्टरना देखील वाटते. डॉ. डीन ऑर्निश यांनी आपल्या संशोधनातून हि मान्यताच चुकीची ठरवली. योग्य आहार, विहार आणि विचाराने हृदयरोग टाळता येतोच पण झालेला हृदयरोग बरा देखील करता येतो, रिव्हर्स करता येतो. हे त्यांनी शास्त्रीयदृष्ट्‌या दाखवून दिले. म्हणूनच त्यांनी या संशोधनाला आणि त्यासाठी कृतीत आणलेल्या कार्यक्रमाला ’’प्रोग्राम फॉर रीवर्सिंग हार्ट डिसीज’’ असे नाव ठेवले.
अँन्जिओग्रा़फी होऊन ज्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला मिळालेला आहे अशा शंभर रुग्णांना त्यांनी या प्रोग्राम मध्ये सहभागी केले. या प्रोग्राम मध्ये त्यांनी जीवनशैलीतील रुग्णांच्या तीन चुकीच्या सवयी बदलल्या. आहारातील तेलाचे आणि चरबीचे प्रमाण कमी करून फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवणे, रोज किमान अर्धा तास योगासने, सूर्यनमस्कार आणि हृदयाचे ठोके वाढवतील असा व्यायाम करणे आणि मानसिक तणावाचे व्यवस्थापन करायला शिकवणे असे जीवनशैलीतील तीन बदल त्यांनी रुग्णांना करायला लावले. हृदय रुग्णांसाठी त्यांनी सजगता ध्यान, कल्पनादर्शन ध्यान आणि करुणा ध्यान किंवा प्रार्थना अशा तीन प्रकारच्या ध्यानाचा रोजच्या दिनचर्येत समावेश केला.
डॉ. ऑर्निश यांचा असा अनुभव आहे कि अशा ध्यानाने आपण आपल्या अंतर्मनाशी संवाद साधू शकतो. हृदयरोग हा केवळ रक्तवाहिन्यांचा आजार नसतो. भावनांचा परिणाम सर्वात जास्त हृदयावर होतो, आपल्या पूर्ण आयुष्यात आपल्याला झालेल्या भावनिक जखमा, इजा आपल्या अंतर्मनात साठलेल्या असतात, आणि पुन्हा तशा जखमा होऊ नयेत म्हणून आपण नकळत आपल्या हृदयाभोवती एक संरक्षक कवच, भिंत उभी केलेली असते. हि भिंत काहीवेळ आपल्या हृदयाचे संरक्षण करते पण त्यामुळे आपला आपल्या हृदयाशी संवादच होत नाही, भावना त्रासदायक असतात म्हणून आपण आपल्याच भावना जाणत नाही, भावनिक वेदनांपासून बचाव करण्यासाठी आपण स्वतःला बधिर करून घेतलेले असते. हृदय पूर्णतः निरोगी करायचे असेल तर केवळ रक्त वाहिन्यांचे प्लंबिंग करून ते होणार नाही, त्यासाठी या भावनिक जखमा भरून यायला हव्यात, त्यासाठी आपला आपल्या हृदयाशी संवाद व्हायला हवा, त्याला आधार, प्रेम द्यायला हवे. ते ध्यानाने शक्य होते.
हृदयरोग पूर्णतः बरा करायचा असेल तर त्याचे मूळ कारण म्हणजे त्या रुग्णाचे आयसोलेशन, एकाकीपणा दूर करायला हवा असा सिद्धांत डॉक्टर डीन ऑर्निश मांडतात आणि त्यासाठी त्रिसूत्री सुचवतात. ओपन युअर हार्ट टू युअर सेल्फ, ओपन युअर हार्ट टू अदरसेल्फ आणि ओपन युअर हार्ट टू हायरसेल्फ अशी ती त्रिसूत्री आहे. ओपन युअर हार्ट टू युअर सेल्फ म्हणजे स्वतःची भावनिक बधिरता दूर करून स्वतःशी मुक्त संवाद सुरू करायचा, आपल्या भावना, तणाव, चिंता, भीती नाकारायच्या नाहीत तर समजून घ्यायच्या! ओपन युअर हार्ट टू अदरसेल्फ म्हणजे मित्र जोडायचे, सपोर्ट ग्रुप निर्माण करायचे, त्यासाठी क्षमा करायला शिकायचे, भावनिक संवाद साधायला शिकायचे, दुसर्‍याच्या भावना समजून घ्यायच्या, एम्पथी वाढवायची. आणि ओपन युअर हार्ट टू हायर सेल्फ म्हणजे स्वतःमधील कर्तेपणाचा भाव आणि अहंकार कमी करायचा. एखादी कृती यशस्वी होण्यासाठी अनेक घटकांचा सहभाग असतो हे समजून घ्यायचे
हृदयरोग बरा करण्यासाठी अहंकार कमी करणे आवश्यक आहे कारण अहंकार हा हृदयरोगाचे एक कारण आहे हे एका संशोधनात लक्षात आले आहे. कॅलीफोर्निया विद्यापीठाचे डॉ. Larry Scherwitz आणि ड्युक विद्यापीठाचे Dr. Redford Williams यांनी Multiple Risk Factor Intervention Trial (MRFIT) या नावाने 13000 माणसांचा नऊ वर्षे अभ्यास केला. त्यामध्ये त्यांना असे आढळले कि बोलताना जे स्वत:चा मोठेपणा सतत सांगत असतात अशांना हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता जास्त असते. अशाप्रकारच्या व्यक्तिमत्त्वाच्या माणसांना, ज्यांना सतत इतरांशी शत्रुत्व आणि स्पर्धा करण्याची सवय असते अशांना हृदयरोग अधिक प्रमाणात होतो.

0 Comments:

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात .

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home