Monday, July 3, 2023

बोलगप्पा_दैनंदिनी लेख 2

#बोलगप्पा_दैनंदिनी
क्रमांक २ 
"आईचंच नाव लिवा, बापाचं नकू"

७ मुलांचे प्रवेश सुटीच्या आधीच झालेले होते. सोबतच्या सरांसोबत राहिलेल्या प्रवेशासाठी निघालो. मुख्य शहरापासून जवळच असल्याने खाजगी शाळांच्या बसेस, ऑटो सर्रास गावात येतात. कॉन्व्हेन्ट शाळांची, इंग्रजी शाळांची क्रेझ आणि इंग्रजी मधून शिक्षण म्हणजेच गुणवत्तेची हमी अशी पक्की धारणा असल्याने नर्सरी पासूनच मुलांना कॉन्व्हेन्ट मध्ये बऱ्याच सुखवस्तू पालकांनी घातलेले होते. नाही म्हणायला शिष्यवृत्ती आणि NMMS परीक्षेत गावातल्या जिल्हा परिषद मराठी शाळेतील मुलींची नावे गावाच्या मुख्य प्रवेशाशी फलकावर दिमाखात झळकत होती. त्याचा फायदा मिळेल अशी आशा वाटत होती. 

गावाच्या एका टोकाकडे राहणारी वस्ती. प्रवेश पात्र मुलांच्या यादीत एक नाव काही केल्याने मिळेना. खूप जणांना विचारून झालं. नाव ही वेगळ्या धाटणीचं. सहज बोलता बोलता मी म्हटलं अशी नाव राजस्थानातील असतात. झाडाखाली निवांत बसलेल्या थोराड मुलांच्या टोळक्यानं ते ऐकलं. म्हणाले एक कुटुंब आहे राजस्थानी, तेच असावं. पत्ता अवघड वाटल्यानं एका मुलाला सोबत घेऊन तिथे पोहचलो. 

फारतर २३-२४ वर्षाची पोरसवदा आईच्या आजूबाजूला दोन छोटी मुलं घुटमळत होती. इथे प्रवेशाची मारामार आणि इकडे या मुलांना आणि त्यांच्या आईला आपली मुलं शाळेत दाखल करण्याजोगी झाली याचा पत्ता सुद्धा नाही. अंगणवाडी ताईंनी खरंच अतिशय अचूक माहिती नोंदवलेली होती. एक डोळा अधू असलेली ती मुलगी मात्र चक्क मराठीतून संवाद करत होती. नंतर कळलं की ती इथलीच, हे तिचं माहेर. राजस्थानी पतीसह तिचं बिनसलं. आई वडिलांनी दुसरं लग्न करून दिलेलं. दुसऱ्या पतीने मारहाण करून दारू ढोसून तिचे हाल केलेले. रागाने माहेरीच राहत असावी.

मी - नाव सांगा मुलांचं…
…..
मी - वडिलांचे नाव सांगा…

????

मी - काय झालं?

उत्तर चटकन न मिळणं…मला चुकचुकल्या सारखं झालं. 

आई - दोघांच्या पैकी कुणाचं तरी सांग की.

ती - सर, दोघांचेही नाव लिवू नका, मवं नाव लिवा….

मी - अगं पण कुणीतरी वडील म्हणून नाव लिहण्याची पद्धत आहे आपल्याकडे.

ती - ज्यानं मया जीवाचे, संसाराचे हाल केले, जो मले कधीच वागवणार नाई. अशा माणसाचं नाव नकू मले. 

सोबतचे सर - नीट विचार करून सांग पोरी. रेकॉर्ड फायनल झालं की पुन्हा सहज बदलता येणार नाही. 

तिची आई आढेवेढे घेत होती….पण तिचं नक्की झालेलं.

ती - सर…मवंच नाव लिवा...तिचं ठाम उत्तर.

मी - आधार कार्ड द्या…

सगळे एकमेकांकडे बघत राहिले.

आई, मुलगी आणि तिचा मुलगा…कुणाकडेच आधार कार्ड नव्हतं. 

आधार नसलेली निराधार माय, पोरगी, नात, आणि शिक्षणातून काहीतरी आधार हाताशी लागेल अशी अधू डोळ्यातील अंधुक आशा बाळगणारी ती दुर्दैवी आई. मला आतून हादरा देत होती. 

प्रश्न प्रश्न उत्तरं उत्तरं….!!

लेखन - संदीप विष्णू राऊत
raaut.sandip@gmail.com 

( गोपनीयता राखण्यासाठी नाव मुद्दाम टाळली आहेत. चित्र प्रतीकात्मक आहे.)

Labels: , ,

0 Comments:

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात .

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home