Wednesday, July 5, 2023

अग्गो बाई ढग्गो बाई !! बोलगप्पा दैनंदिनी

#बोलगप्पा_दैनंदिनी
क्रमांक ३

अग्गो बाई ढग्गो बाई !!

यावेळी शाळा उशिरा सुरू झाल्या आणि दुर्देवाने पाऊस ही उशिरा पडला. सकाळी अतिशय कडकडीत ऊन पडलेलं. मनात म्हटलं आपण आजच डीक्कीत रेनकोट ठेवलेला, पावसाचा जराही अंदाज वाटत नाहीये.

परिपाठ घेताना नव्याने रुजू झालेल्या पहिल्या वर्गाची छान उपस्थिती पाहून आनंद वाटला. अजुनही माहेरी आलेल्या त्या दोन आयांची मुलं दिसली नाही. दुपारी चक्कर मारावी लागणार. पालकांचा व्हॉट्सॲप ग्रुप बनवला, पण अर्ध्या अधिक पालकांकडे स्मार्ट फोनच नाही. सगळंच कुठे मनासारखं व्हायला. असो.

वर्गात बालभारती भाग १ पुस्तकात पहिलाच पाठ कवितेचा. आणि चक्क माझ्या अतिशय आवडत्या जोडीची संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचीआवडती कविता. अग्गो बाई…!! म्हटलं चला सुरुवात यानेच करावी. मुलांना नाचायला, गाणी म्हणायला खूप आवडतं. मला कंबर वाकवून नाचायला खूप वर्ष झालेली. पण म्हटलं जसं जमेल तसं.

अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ
थोडी न्‌ थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ॥धृ.॥ अग्गोबाई …

कंबरेत वाकून अग्गो बाई म्हणताना माझा जरा जाडसर आवाज ऐकून मुलं चक्क हसली मला. पण म्हटलं लाजायचं नाही. मग काय…धम्माल नुसती, मुलांना आवडायला लागली.

वारा वारा गरागरा सो सो सूम्‌
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम
वीजबाई अशी काही तोर्‍यामधे खडी
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी ॥१॥ अग्गोबाई …

ढोल्या ढोल्या ढगात…म्हणताना कुठल्या तरी ढोल्या माणसाची नक्कल खूपच आवडली छोट्यांना. ते कडवं मग फेवरेट झालं…ढुम ढुम ढुम
करत अशी काही खिदळली की..वर्गात नुसता कल्ला झाला.
चमचम छडी हातावर मारताना कमरेचा ठुमका अन् जणूकाही त्यांच्यात मारकुटे पंतोजी शिरले.

खरी धमाल तेव्हा झाली, जेव्हा जोरदार पाऊस सुरू झाला. कुणाला कुणाचा आवाज येईना…. रप रप रप…. पत्राच्या खोल्यात अशावेळी घसा कोकलून काहीही उपयोग नसतो. मग काय, दप्तर बिप्तर गुंडाळून सगळे दाराशी जमा झालो. पावसाच्या काही सरी अंगावर झेलत, जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या आवाजाचा, फरशीवर फुटणाऱ्या फुग्यांच्या गमतीजमतीचा आनंद घेतला. अगदी काहीच वेळात मैदानावर साचलेलं पाणी, वाहणारे गढूळ ओहोळ बघण्याची मजा औरच.

सर लघवीला सोडा ना…अरे पाऊस किती आहे?
प्लीज सर जाऊ द्या ना…बरं भिजू नका, आणि पळत सुटू नका…माझं म्हणणं कुणी ऐकेल तर शपथ…
सगळ्या बहाध्दरांनी पाण्याच्या डबक्यात उड्या काय मारल्या, पत्राच्या पाण्यात एकमेकांना भिजवलं काय, अर्धवट ओले झालेले त्याचे खोडकर चेहरे पाहून मला काय समजायचं ते समजलं. चक्क मला गंडवून त्यांनी पावसाचा पूर्ण आनंद घेतला.

खोलखोल जमिनीचे उघडून दार
बुडबुड बेडकाची बडबड फार
डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव ॥२॥ अग्गोबाई …

साबु-बिबु नको
थोडा चिखल लगाव…..
थोडा चिखल लगाव…..

आता कविता खऱ्या अर्थानं पूर्ण झाली.

लेखन - © संदीप विष्णू राऊत
प्राथमिक शिक्षक (माजी बालभारती राज्य अभ्यास गट सदस्य)
raaut.sandip@gmail.com
(वरील लेख शिक्षक म्हणून मुलांकडून शिकताना येणारे अनुभव यांचे लिखाण आहे.)
चित्रे इंटरनेट वरून साभार.


Labels: , , , ,

0 Comments:

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात .

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home