आशिषला लागली गोडी
#बोलगप्पा_दैनंदिनी
क्रमांक ४
आशिषला लागली गोडी
"अहो आजी सोडा की त्याला, एकतर नाव टाकल्यापासून आज पहिल्यांदा शाळेत येतोय तो. त्याला नियमित शाळेत पाठवा की."
मी म्हटले.
"मामाला वेळ नसतो, आईला लाज वाटते, अन् आईचं ऐकतही नाही तो. म्हणून मी घेऊन आली. त्याच्या बापाबद्दल तुम्हाला तर माहित आहेच गूर्जी." आजी म्हणाली. होय तोच हा आशिष ज्याच्या आईने बापाच्या ऐवजी स्वतःचे नाव लावलेले.
आजीच्या डोळ्यात आणि आशिषच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं होतं. शाळेत दाखल करताना पहिल्या दिवशी सगळेच पालक का हळवे होतात माहिती नाही. मी एक पालक म्हणून सुद्धा हा अनुभव घेतला आहेच. कदाचित आईच्या वडिलांच्या अतिशय मायाळू पदरातून नवख्या पदरात देताना सासरी जाणाऱ्या मुलीसारखा फिल येत असावा.
"ऐकणार नाही गुर्जी तो. काहीवेळ थांबते मी."
तो ही आजीच्या पदराला घट्ट धरून, चोरट्या नजरेने मला जोखत होता. मी म्हटलं, "बैस बाळा. मस्त रंगीत खडू देतो तुला. की एखादं छान चॉकलेट देऊ."
कसल्याच आमिषाला बळी न पडता अजूनच आजीला घट्ट बिलगून तो आणि आजी दोघेही वर्गात बसले. दिवसभर आजीला वर्गात बसावेच लागले.
दुसऱ्या दिवशी सकाळी परत आजी आणि रडका आशिष असेच चित्र बघायला मिळाले. आजी साथ सोडत नव्हती, आणि आशिष रुजत नव्हता. रागावून सुद्धा आजीला सोडण्याची त्याची तयारी नव्हती.
नव्याने आलेली शैक्षणिक साहित्याची पेटी काढून, रंगीबेरंगी चित्रं बघायला दिली. बहुतांशी मुलांकडे पाटीच असल्याने मी मुद्दाम पाटी शिकवायला घेतली. संख्यांची रूपं समजून घेताना मुद्दाम मैदानातून खडे आणायला सांगितले, मग झाडांची पानं आणायला सांगितली. गटात मोजायला सुरुवात झाली. एकास एक संगती लावत संख्यांची समज विकसित करण्याचा प्रयत्न मी करत होतो. अंकांची गाणी म्हणायला सर्वांना मजा वाटत होती.
सगळी मुलं पुढं पुढं येऊन गमतीदार कृती करत होते. एकमेकांची उत्तरं आधी देण्याची चढाओढ लागली होती जणू. चोरट्या नजरेने मीही आशिषला बघत होतो. आणि तो पुढे सरकत सरकत गटात नकळत सामील होत होता. आशिषने चक्क आजीचा पदर सोडला होता. जागा सोडून मोठ्या डोळ्यांनी सगळं बघत होता. अजूनही मुद्दाम मी त्याला काहीही करायला सांगितलं नाही. मग दाखवलेल्या बोटाएवढ्या टाळ्या, उड्या मारायला सुरुवात झाली. गाणी म्हणता म्हणता….आशिष नाचायला लागला.
आजी वर्गाबाहेर गेल्याची जराही भणक त्याला लागली नाही. साधं दप्तर ही नसलेला आशिष जरा मोकळा झाला. हसून बोलायला लागला. वाटतं तेवढं गुरुजी हे प्रकरण गंभीर नाही हे त्याला पटलं असावं. दुपारी भूक लागल्यावर जरा आजीची आठवण झाली. पण एकदाही रडला नाही.
तिसऱ्या दिवशी आजीला विश्वास बसेना. आशिष वर्गात रमताना बघून, एका आईचा पदर सुटला तरी दुसऱ्या आईचा पदर हातात देताना, आजीच्या डोळ्यात निराळीच चमक दिसायला लागली. यावेळी आजीच्या डोळ्यात आलेले अश्रू नक्कीच वेगळे होते.
लेखन - संदीप विष्णू राऊत
raaut.sandip@gmail.com

0 Comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात .
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home