चिमण्यांचा थवा चिमण्यांच्या अंगणी
#बोलगप्पा_दैनंदिनी
क्रमांक 5
चिमण्यांचा थवा चिमण्यांच्या अंगणी
मराठी शाळांमध्ये एखादा शिक्षक सुटीवर गेला की त्याचा वर्ग कुणाला तरी सांभाळावा लागतो. कधी एक तर कधी दोन तीन दिवसांचे पाहुणे विद्यार्थी वर्गात येतात. बैठक व्यवस्था, अध्यापनाची पद्धत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्ग नियंत्रण अवघड होऊन बसतं. असो.
दुसऱ्या वर्गातील पाहुण्यांना एक छोटा अभ्यास देऊन पहिलीला अक्षर गटांची ओळख देणे सुरू होते. काही जागरूक पालकांची मुले पूर्वप्राथमिक शिक्षण घेऊन आलेली असल्याने सुंदर लिहीत होती, अक्षरे ओळखत सुद्धा होती. काही विद्यार्थी मात्र कसलाही गंध नसल्याने शाळा पूर्वतयारी मध्ये अडकून होती. एक दोन लाडके विद्यार्थी तर हातात खडू सुद्धा नीट धरू शकत नव्हते.
छोट्या दोस्तांचा एकाग्र होण्याचा काळ फारच अल्प असतो. त्यामुळे विनोद, गप्पा, गोष्टी, कृतियुक्त बडबडगीते आणि गाणी यांची पेरणी सारखी करावी लागते. हे करतांना शिक्षक म्हणून आपण खूप दमून जातो.
नेमका पाऊस पडून गेलेला होता आणि गट्टू फरश्या थोड्या कोरड्या व्हायला लागल्या होत्या. वर्गाबाहेर का कुणास ठाऊक सर्वात जास्त उत्साह मुलांना असतो. अर्ध वर्तुळात बसवून कसलेही पुस्तक वैगेरे हाती न घेता मी हलक्या फुलक्या गप्पा मारायला लागलो.
वर बघा, काय दिसतं?
आभाळ, ढग….आकाश…. झाडं….. खंबा…. वायरी….
ज्याला जे महत्त्वाचं वाटत होतं ते उत्तर मुलं सांगत होती.
आभाळात काय दिसतं बघा बरं.
ढगं, काले काले…
ढगं पळतात का बघा बरं
हो सर, नाही सर, अय इकडं बघ न, कसे बींग पयतात ते…हो सर बिंगाट पयतात.
ढगात काय असतं?
पाऊस…पाणी….म्हातारी असते सर…ती दयते अन् मग गडगड आवाज होते….तो ढग आता पाणी आणाले चालला…. सर पाण्याची वाफ होते अन् ढगात जाते. हे उत्तर आश्चर्यचकित करणारे होते. आपण शिक्षक म्हणून त्यांना कच्चं मातीचं मडकं समजतो ते चूकच.
सरमिसळ उत्तरे येत होती. कुणालाच न खोडता, त्यांच्या त्यांच्या कलाने गप्पा पुढे पुढे जाऊ देत होतो. घरच्या भाषिक समृद्धीचा आणि आर्थिक समृद्धीचा थेट संबंध बघायला मिळत होता. पण विचार करताना मात्र सर्वच मुले आपल्या भाव विश्वातील उत्तरे देत होती.
तेवढ्यात गंमत झाली. मुलांच्या पाठीमागे पोषण आहाराच्या खोली पुढे तांदूळ, डाळ आणि खरगटे दाणे वेचायला चिमण्यांचा थवा येऊन बसलेला. माझं आणि मुलांचं एकचित्त होऊन गप्पात गुंग होणं, म्हणून की काय त्या मस्त शाळा भरवून दाण्यांचा आस्वाद घेत होत्या. त्यांना जराही कळू न देता, मी मुलांना बोटाने खुणावले. बसल्या जागी तोंड फिरवून सगळ्यांना चिमण्या दाखवल्या.
हळू आवाजात मोजून सांगा किती चिमण्या आहेत. एक दोन बहाद्दर मोजायला जवळ जाणारच, मी त्यांना हाताने खाली बसवले.
सर 7 चिमण्या, नाही चार चिमण्या….दोन उडाल्या बी…..आता अजून एक आली रे…तीन झाडावर गेल्या. ते दोघं मित्र असतीन रे.
सगळी चिमण्या मोजण्यात गर्क झाली. खोडावर किती बसल्या? किती उडाल्या अन् किती राहिल्या??
चिमण्याचं घर कुणी कुणी पाहिलं? कसं बनवतात ते.
चिमणा चिमणी…कावळ्याची गोष्ट…आमच्या घराच्या गच्चीवर हाय सर त्यायच घर. एकदा एक पिल्लू पडलं होतं. आम्ही त्याले पाणी पाजलं.
सर तिची मम्मी तीले दूध पाजत असन का? कावळा कुठं राहतो? कबुतराचा आवाज कसा? कोंबडी सुद्धा अंडं देते. पण तिले उडता नाई येत.
आम्ही इंद्रधनुष्य पाह्यलं होतं….त्यात लाल कलर असते. निळा बी असते. काळा असते का सर??
कबुतर हाय सर एक, एक टिटवी हाय….स्पैरो आहे सर…
भाषा, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास…अन् कुठलं कुठलं काय…माहित नाही. तब्बल दोन तास त्यांचं चित्र विचित्र भाव विश्व गप्पा मधून धबधब्यासारखं ओसंडत होतं.
पुस्तकाबाहेरची शाळा यानिमित्ताने मला शिकायला मिळाली. हा धडा अजून चांगला गिरवायला पाहिजे हे नक्की.
शब्दांकन - संदीप विष्णू राऊत (प्राथमिक शिक्षक)
raaut.sandip@gmail.com
( सर्व छायाचित्र वास्तविक आहेत.)

0 Comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात .
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home