स्टेटस बिटस पुराण
स्टेटस बिटस पुराण #सहजच #हलकं_फुलकं (पूर्ण वाचा आणि प्रतिक्रिया द्या)
"माझं आजचं स्टेटस बघितलं का?" मित्राचा मेसेज आलेला. ही म्हणजे जरा हद्दच झाली.
"काय यार मी चांगला मित्र समजत होतो तुला, आजकाल लक्ष नाहीये तुझं माझ्याकडे. साधं स्टेटस तरी बघत जा की."
"त्या बायकांचे स्टेटस बघायला बरा वेळ असतो तुम्हाला, बायकोचे स्टेटस कधीतरी बघत जा."
"काय झालं? बरा आहेस ना? नाही म्हणजे बरेच दिवस झाले एक साधं स्टेटस बिटस दिसलं नाही अशात..."
"माझ्या स्टेटस ला कमीतकमी ५०० व्ह्यू असतातच." कधी कधी तर भावा एक हजार क्रॉस जातात."
असं खूपवेळा ऐकायला मिळत असेलच आपल्याला. सकाळी उठल्यावर आणि झोपण्याच्या आधी....ब्रश वैगेरे केलं पाहिजे...बरोबर ना??
साफ चुकला अंदाज तुमचा....अहो स्टेटस बघितलं पाहिजे स्टेटस... प्रभाते कर दर्शनम....हाहाहा.
स्टेटस चा शब्दशः अर्थ स्थिती, प्रतिष्ठा असा होतो. आजकाल आपली मनस्थिती, आर्थिक स्थिती आणि प्रतिष्ठा ( खरी खोटी) दाखवायला याचा उपयोग होतो. सुंदर विचार, quote आणि मधुर गाणी, सुंदर फोटो, कलाकृती आणि संदेश सुद्धा बघायला मिळतात. पण त्यातील परस्पर विरोध, द्वंद्व, हास्यास्पद अनुभव यांचा हा हलका फुलका धांडोळा.
हा प्रकार व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक ने एकदम पॉप्युलर केला. सर्वात जास्त engage व्हॉट्सॲप स्टेटस पाहायला मिळतो. कारण सर्वात सुटसुटीत आणि सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल ॲप मध्ये सध्यातरी व्हॉट्सॲप चा नंबर पहिला असावा.
सोशल मीडिया पासून पूर्णपणे दूर राहणारे, किंवा अतिशय संयमाने वापरणाऱ्या मोजक्या सन्माननीय अपवाद असणाऱ्या महाभागांना साष्टांग दंडवत. खरंच, मला अशा व्यक्तींचा प्रचंड आदर वाटतो. ह्या व्यक्ती मला ऋषितुल्य वाटतात. जगाच्या एवढ्या प्रचंड आकर्षक मोह मायेपासून यांनी मुक्ती मिळवली आहे. खऱ्या अर्थानं ह्या व्यक्ती जीवनाचा आनंद घेत आहेत. मी त्यात मोडत नाही हे ओघाने आलंच. आपण सोशल मीडिया वरती पडीक असतो असेही नाही, पण त्यापासून दूर राहता येत नाही. त्याच्या सकारात्मक बाजू भुरळ पाडतात. असो.
आधीचा स्टेटस संपला, आणि स्टेटस ची चौकट रिकामी राहिली अस पाप कधीही करू नये. शक्यतो 24 तास संपण्याआधी नवे स्टेटस ठेवलेच पाहिजे असा अलिखित नियमच आहे. त्यातही वाढदिवस वैगेरे असेल तर जेवढ्या लोकांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या त्यांचे स्क्रीन शॉट काढून लगोलग ते स्टेटस ला ठेवता आले पाहिजे. मला शुभेच्छा दिल्या यापेक्षा कुणी कुणी दिल्या, आणि कुणी दिल्याचं नाही हे समजले पाहिजे. शक्यतो फेसबुक किंवा व्हॉट्सॲप वर डी पी बदलण्याचा हा सर्वात उत्तम मुहूर्त असतो. यातून कुणी सुटलाच तर त्याला माझा वाढदिवस आहे हे सुप्तपणे कळवण्याचा हा छुपा प्रकार आहे.
स्टेटस किती ठेवावेत हा ज्याच्या त्याच्या क्षमतेचा प्रश्न आहे, वाचकाच्या सहनशीलतेचा नव्हे. घटत्या सिद्धांताचा इथे प्रत्यय येतो हा भाग वेगळा. शक्यतो फोटो स्टेटस बघण्याचा कल अत्याधिक आहे, व्हिडिओ बिडियो बघण्यात वाचकांना फारसा रस नसतो. त्यातही पुरुष मंडळी असतील तर सुंदर फोटो असणाऱ्या सेलिब्रिटी मंडळीचे स्टेटस बघण्यात जास्त रस असतो (इथेही अपवाद महाभाग यांना नम्रपणे वगळून). स्टेटस ठेवून झाल्यावर मिनिट भरात किमान दहा तरी व्ह्यू आले तर बरं, नाहीतर अस्वस्थ व्हायला होतं काही जणांना. जेवण्याची वेळ होईपर्यंत कमीत कमी १०० -२०० व्ह्यू मिळाले तर जेवण छान पैकी जातं.
फेसबुक वर तर लाईक का केले नाही, केले तर शुभेच्छा का दिल्या नाही, यावरून वाद घालणारे मित्र मैत्रिणी बघायला मिळतात. घट्ट मैत्री असलेले मित्र, मैत्रिणी आणि कुटुंब सदस्य यांच्या समूहावर तर वाढदिवस, एखादे प्रमाणपत्र, प्रमोशन किंवा एखादा पुरस्कार मिळाल्यावर कुणीच प्रतिक्रिया दिली नाही किंवा खूपच उशिरा दिली की या जगातून निघून जाण्याची भावना उचंबळून येते. ( ही भावना लगेच लाईक्स आणि कमेंट मिळाल्यावर निघून जाते हा भाग वेगळा...)
स्टेटस कोणता टाकावा हा पहिला प्रश्न असतो, त्यानंतर आपला टार्गेट area कोणता आहे, यानुसार त्यांनी बघितला का हे बघावं लागतं. ज्याने बघावा त्याने बघितला की नाही हेही बघावं लागतं. ज्यांनी बघावं त्यांनी का बघितला नसेल हेही बघावं लागतं. काही मिनिटांनी, तासांनी किंवा हाती मोबाईल लागेल तेव्हा तेव्हा एकूण किती व्ह्यू झाले हे अत्यंत काटेकोरपणे बघणे हे शास्त्र असतं. हे बघता बघता तासभर वेळ कुठे गेला हे बघायला गेलं की मनस्ताप वैगेरे होतो, पण त्याला इलाज नाही.
स्टेटस बघणाऱ्या लोकांची वेगवेगळी कॅटेगरी असते. सरसकट जेवढे कॉन्टॅक्ट असतील त्यांचे स्टेटस भराभर बघणारे पण कुणालाही प्रतिक्रिया न देणारे यात मोडतात. कारण त्यांनी मुळात ते नीट वाचलेलं नसल्याने प्रतिक्रिया उमटणे अशक्यच असतं. दुसरा प्रकार निवडक लोकांचे स्टेटस ठरवून बघणारे. हे खूप चतुर लोक असतात. वेळेचे व्यवस्थापन काटेकोर करत असल्याने हे चुझी असतात. स्वतःचे स्टेटस कुणी बघावं यासाठी सेटिंग करून ठेवण्याची काळजी यांनी घेतलेली असते.
तिसरा प्रकार हा अघळपघळ स्टेटस बघणारे लोक, यांचे काही नियम ठरलेले नसतात. फावल्या वेळात जमेल तसं स्टेटस बघणे, आवडले तर उस्फुर्त प्रतिसाद देणारे हे मनाने मोकळे ढाकळे लोक असावेत. (यावर चांगला शो होऊ शकेल, स्टेटस बघणाऱ्या लोकांचे व्यक्तिमत्त्व)
चौथा प्रकार म्हणजे ज्याचे स्टेटस आवडले त्यांचे मागून घेणारे, जमल्यास कॉपी पेस्ट करणारे लोक. स्वतः वेगळे स्टेटस ठेवण्यापेक्षा इतरांनी ठेवलेले छान स्टेटस ते ठेवतात. यासाठी लागणार धैर्य आणि मनाचा मोठेपणा असल्यामुळे असेल कदाचित, यानिमित्त का होईना पण ते खुली दाद देतात. किंवा स्टेटस शोधत बसण्याचा त्रास घेण्याची त्यांची इच्छा नसेल.
स्टेटस मधील सुविचार बघून किंवा मोटिवेशन बघून किती लोक सुधारतात माहिती नाही. स्टेटस मुळे किती लोक प्रभावित होतात माहिती नाही. पण माणूस हा सामाजिक प्राणी आहे. कुजबुज करणे, गप्पा मारणे, एकमेकांच्या सहवासात राहणे ही माणसाची मानसिक गरज आहे. व्यक्त होणं, स्तुती मिळणं आणि सामाजिक स्थान मिळणं ही मानसिक गरज असतेच.
स्टेटस ठेवा अगर न ठेवा पण चेहरा नसलेल्या ह्या गर्दीत एकमेकांची विचारपूस केली पाहिजे. प्रत्यक्ष भेट, बोलणे चालणे यासारखे सुंदर स्टेटस खरंच कोणतेच नसते. खोटं वाटत असेल तर आताच ठेवलेलं माझं स्टेटस बघितलं का ??
© लेखन - संदीप विष्णू राऊत
Labels: मराठी, ललित, लेख, हलकं फुलकं

0 Comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात .
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home