शिकायला पैसे लागत नाहीत बोलगप्पा दैनंदिनी क्रमांक 9
#बोलगप्पा_दैनंदिनी
क्रमांक ९
शिकायला पैसे लागत नाहीत
सकाळची हजेरी वैगेरे घेऊन झाली आणि मी छोट्या दोस्तांना आनंदाचा धक्का दिला. म्हटलं चला दप्तर, वही आणि सगळी पुस्तके गुंडाळून ठेवा. आज आपण फिरायला जाणार आहोत.
हुररे….येह….मज्जा…
सगळी जागेवरच उड्या मारायला लागली. बाहेर वातावरण जरा पावसाळी होतं पण पाऊस पडत नव्हता. कोरडेपणा असल्याने जायला हरकत वाटली नाही. शाळेच्या अगदी जवळच एका शेतात जाण्याचा विचार होता. गोंधळ होऊ नये म्हणून दोन दोन मुलांच्या जोड्या तयार केल्या, रस्त्याच्या कडेला एका रेषेत फिरस्ती सुरू झाली.
मंदिराच्या बाहेरच्या बाजूने काही आगंतुक झाडं वेली उगवलेली होती. सर्वांना तिकडे घेऊन गेलो. झाडांची नावं विचारली. वेलींची नाव विचारली.
"सर ही टोंगळ मोडी आहे. ठेच लागली की आम्ही पायाले लावतो."
"हे धोतरा हाय सर.
हा तरोटा हाय. ही कारल्याची वेल हाय, नाही रे भेदरं हाय ते. हे रान वांग हाय सर…."
काही काही झाड पाल्यांची नावं मलाही माहिती नव्हती. खरंतर माझ्या पेक्षा जास्त माहिती त्यांनाच होती. मंदिराच्या परिसरात असलेली फुलं, निरनिराळ्या गवताच्या जाती. छोटी छोटी गवत फुलं. आम्ही सरळ खाली फतकल मारून बसलो. वेलीला झाडांसारखा आधार नसल्याने त्या स्प्रिंग सारख्या कशा इतर झाडांना खांबांना चिकटत चढत जातात, छोटी उडणारी फुलपाखरं, कोळी किड्यांचे जाळे, शेण किडे आणि पाण्यावर तरंगत जाणारी चतुर किड्यांची हेलिकॉप्टर सारखी उडाण बघायला सगळ्यांना मजा येत होती.
शेतात जाताना रस्ता निमुळता होता. शेताच्या कडेला असलेला खताचा खड्डा थांबून बघितला. तो का आणि कसा बनवतात. कचरा टाकताना प्लास्टिक त्यात का टाकू नये अश्या गप्पा ही झाल्या. शेतातील एकही रोप पायदळी येणार नाही अशा पायवाटेने एक एकच्या रांगेत आम्ही अजून आत शिरलो. बांधावर तर कितीतरी प्रकारचे वैविध्य आमची वाट बघत होते. बालसुलभ मनाने त्यांनी मस्ती करून घेतली. नंतर मुद्दाम वेडा बनुन मी प्रश्न विचारत राहिलो.
शेताची मशागत, पेरणी, निंदन, काढणी, फवारणी, आणि मजुरी सारखे प्रश्न यावर भरभरून मुलं बोलत होती. काही मुलं अजूनही बांधावर काही मेवा खायला मिळतो का ते शोधत होती. पावसाच्या हलक्या फुलक्या सरी सुरू झाल्या. भिजू नये म्हणून आम्ही झाडांच्या आडोशाला जायला लागलो. पावसाचा जोर वाढेल असा बेत दिसला. लगबगीने पावलं उचलली. काही फुलं, रोपं मुळासकट उपटून सोबत घेतली. वर्गात एकदाचे पोहचलो. सगळ्या प्रवासाची उजळणी केली. फुलझाडांची राहिलेली माहिती वर्गात पूर्ण केली.
मुलांशी केलेल्या गप्पा, त्यांच्या मनात येणाऱ्या चित्रविचित्र प्रश्नाची सोडवणूक, आपल्या परिसरातील निसर्गाची विविधता न्याहाळणं हा सुद्धा शिक्षणाचा एक भागच आहे. मोठ्या शाळांमध्ये एखाद्या तुरुंगात रवानगी केलेल्या शिस्तप्रिय चमकदार शाळांपेक्षा छोट्या छोट्या शाळांमधून व्यक्तिमत्व विकासाच्या अधिक संधी मुलांना मिळतात.
अध्यापनासाठी खर्चिक महागड्या आणि सुसज्ज भौतिक सुविधाच हव्या, शैक्षणिक साधने भारदस्त हवी असं काहीही नसतं. शिक्षक म्हणून सजग मनानं उपलब्ध साधनांनी शिकणं रंजक होऊ शकतं. जरा वाटा वाकड्या कराव्या लागतात इतकंच.
लेखन - संदीप विष्णू राऊत (प्राथमिक शिक्षक)
raaut.sandip@gmail.com
(Picture courtesy internet)

0 Comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात .
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home