जागतिक छाया चित्रण दिनानिमित्त
जागतिक छायाचित्रण दिवस निमित्त माझी फोटोग्राफी. #हलकं_फुलकं
मोबाईल नव्हता तेव्हा रोलच्या साध्या कॅमेराने फोटोग्राफी ची हौस भागवून घ्यायचो. त्याला अगदीच मर्यादित सुविधा असल्याने छायाचित्र म्हणून फार विशेष काही काढल्या गेलं नाही. पुढे मोबाईल आले, आणि स्वतःचा हक्काचा कॅमेरा कायम खिशात राहू लागला. सेल्फी, वाढदिवसाचे किंवा कुठे फिरायला गेल्याचे खूप फोटो काढले. त्या फोटोत का कुणास ठाऊक मन कधीच रमत नाही.
स्केचिंग आणि पेंटिंग ची आवड असल्याने असेल कदाचित रंग, रचना आणि लयबद्ध सुंदर मांडणी दिसली की त्याचा फोटो घेण्याचा मोह आवरत नाही. जमीन, झाडाचे खोड, पानांची रचना, वेगवेगळे पोत, कागदाचे, कपड्यांचे, आकाशाचे बदलते रंग ढंग सगळंच फक्त डोळ्यांनी बघून भागत नाही. उघडे डोळे आणि सजग मन सोबत असलं की पावला पावलावर अप्रतिम सौंदर्य हात जोडून उभं असतंच.
खास व्यावसायिक दर्जाचा कॅमेरा अजूनही स्वप्नच आहे. पण मोबाईल मुळे काही प्रमाणात का होईना ही हौस भागवून घेत राहतो. कॅमेरा कुठलाही असो त्यामागे असणारे डोळे आणि संवेदनशील मन किती मेगा पिक्सेल चे आहेत यावर छायाचित्र सुंदर दिसेल की नाही हे ठरतं असं माझं ठाम मत आहे. ज्याप्रमाणे संगीत जाणायला, चित्र किंवा कविता जाणायला एक रसिक मन लागतं तसंच कलासक्त मन उत्तम छायाचित्र बघायला लागतं.
कलेच्या अंगाने छायाचित्रण हा सुद्धा मानवी अभिव्यक्तीचे साधनच आहे. भूतकाळ एखाद्या क्षणात थांबवून ठेवण्याची दैवी कला फोटो ग्राफर मध्येच असते. कितीही म्हातारे झालो तरी आपलं कोवळंपण, आपली हिरवाई, आपल्या जीवलगांचे हळवे क्षण पुन्हा मिळवून देण्याची अजब क्षमता छायाचित्रात असते.
फोटो काढून फेसबुक किंवा इंस्टाग्राम वर टाकून मोकळे होऊ नका. निवडक फोटो वेळच्या वेळी संग्रही ठेवत चला. जुने फोटो छान दिसत नसले तरीही ती स्मृतींच्या कप्यात जाणीवपूर्वक राखून ठेवत चला. गरजेपेक्षा अधिक फोटो काढणे मला आवडत नाही. फसलेले फोटो वेळच्या वेळी delete करून टाकत चला. एखाद्या प्रसंगाचा आनंद जास्त महत्त्वाचा असतो, त्याचे चित्रण नाही. गरजेनुसार फोटो झाल्यावर मुळ कार्यक्रमाचा, प्रसंगाचा जिवंत अनुभव घेणे जास्त महत्वाचे असते ह्याचे भान ठेवूया.
आपले अनुभव नक्की अभिप्रायामध्ये येऊ द्या.
शब्दांकन - संदीप विष्णू राऊत
raaut.sandip@gmail.com
Happy #WorldPhotographyDay2023

0 Comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात .
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home