रसरसून जगण्याचे किती बहाणे
रसरसून जगण्याचे किती बहाणे
#हलकं_फुलकं
पहाटे उठल्यावर एखाद्या निर्मनुष्य रस्त्यावर फिरताना पक्ष्यांचा किलबिलाट आणि कोकिळेचा मधुर आवाज ऐकायला आला, आजूबाजूला आपल्या अंगभूत सौंदर्याने नटलेल्या गवतांचे भुरभुरणारे जावळ आणि त्यावरची बिनधास्त डोलणारी गवतफुले बघितली की जगण्याची लालसा कशी उचंबळून येते. अगदी दुर्लक्षित असलेल्या शेताच्या बांधावर, पडक्या भिंतीवर, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात उमलून आलेली सदाफुलीची, रानफुलांची फुलं, हिरव्यागार वेली, माहित नसलेल्या कसल्या कसल्या जातीची फुलं जेव्हा उस्फूर्तपणे त्या विद्रूप जगाचे बगीच्यात रूपांतर करतात ते बघून जगण्याच्या ओझ्यातून मन मोकळं होतं.
निराशा दाटून आली की उगवलेला सूर्य सुद्धा मलूल वाटत असतो. तेव्हाच एखादी महम्मद रफी, किशोर किंवा मुकेशची एखादी लकेर कुठल्याश्या रेडिओ वर ऐकायला मिळते, आणि जगणं त्या क्षणापुरतं थांबून जातं. त्या अवस्थेत तिथेच कानाची मैफिल सजते. काळवेळ, स्थळाचे भान सुटते आणि तरुण किशोर वयाची एखादी गार वाऱ्याची झुळूक भूतकाळात घेऊन जाते. एखादी गुलाम अली ची गझल आपल्या भोवती वाह वाहची दाद देणारी दर्दी गर्दीचा आभास निर्माण करते. लता दीदीचे स्वर, आशा भोसले यांच्या आवाजात "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या" सारखी लकेर जगायची उत्कट उर्मी निर्माण करते. किती सुरेल जग आहे हे संगीताचे. एका जन्मात ऐकतो म्हटलं तरीही गाण्यांचे हे अफाट मायाजाल भोगायला आयुष्य थिटे आहे. उत्तमोत्तम रागदारी, गझला, शेर, अभंग, ओव्या, भावगीतं, पोवाडे, अंगावर काटे आणणारी भीमगीतं... जात्यावरची गाणी, भुलाबाईची गाणी, भारुड, कीर्तन, कव्वाल्या, भक्तिगीतं, वाद्य संगीत....
जगायला मोठी मोठी स्वप्न, मोठ्या मोठ्या महत्त्वाकांक्षा हव्याच असं काही नसतं. आनंदी जगायला अगदी छोट्या छोट्या गोष्टी पुरेशा ठरतात. आपल्या आजूबाजूला असणारी ही माणसं आपल्या अंतरंगात किती मोठं जग साठवून असतात. त्यांच्याशी बोलायला गेलो तर ऐकता ऐकता आपलं दुःख गळून जातं. आपला अहं कमी होतो. एखाद्या ध्येयासाठी, सेवेसाठी झपाटून काम करणारी माणसं स्वतः साठी जगत नाहीत. दुसऱ्याला देण्यात, सेवेत त्यांना सुख लाभतं. त्यांची चरित्रे समजून घेण्यात केवढं सुख आहे.
कागदावर रंग रेषांची आणि त्यातल्या कॅनव्हास चौकटीत अख्ख भावविश्व चितारणाऱ्या चित्रकाराची कला प्रत्यक्ष चित्र काढताना अनुभवली आहे का? सृजनाची त्याची प्रक्रिया बघणाऱ्याला आणि चित्र रेखाटणाऱ्या दोघांना ही प्रचंड आनंद देणारी प्रक्रिया असते. एवढं अनंत आकाश जेव्हा एखादा कुंचला कागदावर उतरवत असतो तेव्हा त्या कलेने जगण्याचा रंग तकाकी आणतो. उत्तम चित्रकाराची चित्र प्रदर्शनी बघण्यात, स्वतः जमेल तसं चित्र रेखाटण्यात रंगवण्यात किती आनंद भरून उरला आहे. तैल चित्र, जलरंग, ॲक्रालीक, पोस्टर रंग, पेन्सिल पेनाचं साधं अचूक गिरगिटणं, नेमकी व्यंगाची उणीव शोधून तेवढी व्यंगचित्रात उतरवणं. अगदी मार्मिक टिप्पणी करून वाचकांकडून दाद घेणं यात किती रस भरून उरला आहे.
माणसाचं आयुष्य हा निसर्गाचा गोड अपघात आहे. त्याला न भोगता आत्महत्या करणं, त्याला वाळवी लागल्यासारखं पोखरू देणं, उदासवाणं आणि पंचंद्रिये आकसून घेणं कितपत योग्य आहे? पुस्तके वाचायची आणि त्यातला आनंद लुटायचा म्हटलं तरी आयुष्य अपुरं पडतं. एका एका पुस्तकातून काळाचा, व्यक्तींचा, प्रदेशाचा, जात धर्माचा, कुठल्या कुठल्या आयामांचा केवढा धांडोळा घेता येतो. किती भरभरून जगणाऱ्या लोकांना भेटता येतं? वेदनांशी नाळ जोडता येते, अशक्य स्वरूपात सुद्धा जगण्याच्या वाटा धुंडाळता येतात. कविता, ललित, नाटकं, आत्मचरित्र, कथा, प्रवास वर्णने....किती किती सुरेख मोहमयी दुनिया आहे ही.
रोजच्या खाण्यापिण्यात असलेल्या खाद्य पदार्थात एक अख्खं आयुष्य देता येईल एवढी प्रचंड विविधता आहे. जिभेचे चोचले पुरवणारी ग्रामीण, शहरी, आदिवासी, डोंगरी भागातली खाद्य विविधता. राज्याराज्यातील, देशादेशातील चवीची ही अजब दुनिया जगायला भुरळ पाडत नाही का? खाद्य पदार्थ बनवणे, खिलवणे आणि एखाद्याने बनवलेल्या खाद्य पदार्थांचे कौतुक करण्यात केवढी जगण्याची आसक्ती ठासून भरलेली आहे. माणूस चारा खाणारा प्राणी नाही, त्याला पदार्थ डोळ्यांनी, नाकांनी आणि शेवटी जिभेनी आस्वाद घेत घेत खायला आवडतं.
संवेदनशील छायाचित्रण करताना मनाला केवढा आनंद मिळतो. माणसांची, प्रसंगांची, शहराची, फुलांची, निसर्गाची, प्राण्यांची, पक्ष्यांची, कीटकांची एकेक स्वतंत्र दुनिया आणि त्यांचे स्वतंत्र अस्तित्व कॅमेऱ्याचा डोळ्यातून बघताना स्तिमित व्हायला होतं. ऊन सावल्यांचा खेळ, पाऊस, वारा आणि डोंगर दऱ्या, प्रचंड विविधता असणारी झाड झुडपं, रोज रोज बदलणारं गूढ आकाश, समुद्र, नद्या आणि जमिनीवर तयार झालेली अद्भुत रचना. हे टिपताना एक आयुष्य कसं पुरेल?
जगायला अजून किती बहाणे हवे? सुताराच्या कामात, कुंभाराच्या चाकावर, गवंडीच्या रचनेत, शेतातल्या बहरणाऱ्या पिकांवर, शिंप्याच्या वेल बुट्टीवर, पाणी पुरी विकणाऱ्याच्या शेव पुरीवर, जत्रेत बासुरीचे सुर काढत बासरी विकणाऱ्या त्या पोटावर....जगण्याचा केवढा आनंद भरून उरला आहे. हातपाय तुटलेले असूनही जगण्यावर प्रेम करणारा जीव, डोळे आंधळे असूनही कानातून स्पर्शातून जग साठवून ठेवणारा जीव, जगण्याची कसलीही साधने नसलेला रस्त्याच्या कडेला झोपलेला जीव आपल्याला काय सांगतो आहे? रसरसून जग, भरभरून जग. जगायला छोटंसं निमित्त पुरेसं असताना सगळं सौंदर्य भरून असलेलं जग हात जोडून तुझी वाट बघतंय.
स्वतः साठी जग, इतरांसाठी जग, बेंबीच्या देठापासून जग. आनंदाने साजरा कर हरेक दिवस. कला, छंद, समाज कार्य, कार्य क्षेत्रातला आनंद आणि छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याची दृष्टी एकदा मिळाली तर जगणं एक उत्सव होऊन जाईल.
© संदीप विष्णू राऊत
- raaut.sandip@gmail.com
- 29.10.2023
Labels: हलकं फुलकं ललित लेख

0 Comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात .
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home