Thursday, November 9, 2023

धमाल मस्ती आणि आनंदच आनंद

#बोलगप्पा_दैनंदिनी 
धमाल मस्ती आणि आनंदच आनंद 
लेख क्रमांक १५

गेली चार दिवस शाळेत वेगवेगळया स्वरूपात मुलांसोबत दिवाळी पूर्व उपक्रमांची रेलचेल सुरू आहे. सुरुवात अनपेक्षितपणे झाली. प्रथम सत्रातील संकलित चाचण्या आणि त्या चाचण्यांचा अभ्यास या गंभीर गोष्टींमुळे मुळे काहीशी गंभीर झालेली होती. त्यात योगायोगाने एकेदिवशी शाळेत कमी शिक्षक आणि मुख्याध्यापकांना अतिशय तातडीचे प्रशासकीय काम आलेले होते. पाच वर्गांना एकत्रित सांभाळायचे होते. सोबतच्या सहकारी शिक्षिकेला प्रश्न पडला आता काय करायचं? मी म्हटलं ही तर संधी आहे. तसेही दिवाळी जवळ आलेली होती. म्हटलं आज आपण आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा घेऊया. 

पहिली अडचण अशी की रंगीत कागद नव्हते, गावात दुकानावर मिळणार सुद्धा नव्हते. बाकी साहित्य माझ्याकडे होतेच. म्हटलं नो प्रोब्लेम. एका मुलाला पाठवून तीन चार पूर्ण आकाराची वर्तमानपत्र रद्दी मिळवली. बाहेर मस्त पैकी सतरंजी अंथरली आणि छोटा टेबल लावून ओरिगामी मधील आधी साध्या घड्या शिकवल्या. त्याचा सराव झाल्यावर टप्याटप्याने दोन प्रकारचे आकाश कंदील बनवून दाखवले. सोबत सोबत मुलांनी सुद्धा प्रयत्न करून बघितले. दुसऱ्या दिवशी येताना सगळ्यांना आव्हान दिले की वेगवेगळ्या प्रकारे आकाश कंदील बनवून आणा. आवश्यक तेथे मोठ्यांची मदत घ्या. सजावट करून आणा. 

दुसऱ्या दिवशी योगायोगाने मी जरा लवकर आलेलो होतो. मुले आकाश कंदील घेऊन आलेली होती. मी थक्क झालो, किती अप्रतिम आकाश कंदील बनवलेले होते. कुणी टिकल्या, कुणी डाळ, कुणी तेलखडू, कुणी अगदी वहीचे कागद, रंगीत चिकट पट्ट्या, रंग इत्यादी कल्पकतेने वापरून सजावट केलेली होती. बाहेरच्या व्हरांड्यात मी सगळे लटकवून ठेवले. सगळे येताच पाहून खूश झाले. परिपाठात शाब्बासकी देऊन त्यांचं कौतुक केलं. 

त्यानंतर आज रंगीत ड्रेस, रांगोळी स्पर्धा, गोडधोड फराळ, आणि शेवटी चेरी ऑन टॉप...समूह नृत्य असा भरगच्च कार्यक्रम ठेवलेला होता. सर्व सहकारी मंडळींनी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उत्साही सहभागातून एकसे एक सुंदर रांगोळ्या, खूप सारे फोटो, व्हिडिओ, मध्यान्ह भोजन दरम्यान गरमागरम जिलेबी, दिवाळी बद्दल पोटभर गप्पा, संवाद साधला. सायंकाळी वयानुरूप समूह करून समूह नृत्य उर्फ डान्स घेतला. 

मराठी शाळांमध्ये येणारी मुलं वेगवेगळया आर्थिक, सामाजिक गटातून येतात. प्रत्येकाला किती उत्सव साजरा करायला मिळतो माहित नाही. शिक्षक मुख्याध्यापक यांच्या सोबत एक छान नातं तयार व्हायला, बुजरेपणा कमी व्हायला आणि मनसोक्त व्यक्त व्हायला असे शैक्षणिक उत्सव खूप मदत करतात. शालेय जीवनातील तोचतोचपणा यातून कमी होऊन उत्साह नव्याने संचारतो. भावनिक, सामाजिक आणि सांस्कृतिक भूक काही प्रमाणात भागवता येते. 

शब्दांकन - © संदीप विष्णू राऊत
raaut.sandip@gmail.com

Labels: , ,