Friday, September 16, 2016

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र प्रश्नावली

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम प्रश्नावली

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम 

प्रश्नावली

१)            प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा मुख्य हेतू काय आहे?

उत्तर  : प्रत्येक मुलाच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती सर्वाना व्हावी. शिक्षकांना मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी मदत करणे हा मुख्य हेतू आहे.

२)   प्रगत शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत वर्षभरात किती चाचण्या घेण्यात येणार आहेत?

उत्तर  : तीन

३)             चाचण्या कोणत्या प्रकारच्या असतील?

उत्तर  : पायाभूत चाचणी ,संकलित चाचणी १ व संकलित चाचणी २

४)            या चाचण्या कोणत्या कालावधीत होतील?

उत्तर  : पायाभूत चाचणी माहे सप्टेंबर २०१५  , संकलित १ माहे नोव्हेंबर २०१५ आणि संकलित २ माहे एप्रिल २०१६

५)            पायाभूत चाचणी  कोणत्या क्षमतांवर आधारीत राहील?

उत्तर  : पायाभूत चाचणी मागील इयत्तेपर्यंतच्या मुलभूत क्षमता व त्या त्या इयत्तेच्या प्रमुख क्षमता

६)            संकलित मूल्यमापन १ चाचणी कोणत्या क्षमतांवर आधारित असेल?

उत्तर  : संकलित मूल्यमापन १ सत्रांत चाचणी ही मागील इयत्तेपर्यंतच्या मुलभूत क्षमता आणि पहिल्या सत्राखेर पर्यंतच्या क्षमतांचे काही प्रश्न या चाचणीमध्ये असतील.

७)            संकलित मूल्यमापन २ चाचणी कोणत्या क्षमतांवर आधारित असेल?

उत्तर  : संकलित मूल्यमापन २  सत्रांत चाचणी मुलभूत क्षमता,पहिल्या आणि दुसऱ्या सत्राखेर पर्यंतच्या क्षमतांचे काही प्रश्न या चाचणीमध्ये असतील.

८)            चाचणी आयोजनात लेखी चाचणीसाठी किती वेळ लागेल?

उत्तर  : चाचणीसाठी वेळेचे बंधन नाही. संपूर्ण दिवसभरात मुलांच्या गतीने चाचणी घेण्यात येईल.

९)            या चाचण्या किती गुणांची असतील?

उत्तर  :  चाचण्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातील  भारांशानुसार असतील.

१०)       चाचण्यांचे इयत्तानिहाय गुणांकन कसे राहील?

उत्तर  : इयत्ता पहिली व दुसरी - ३० गुण, इयत्ता तिसरी व चौथी- ४० गुण , पाचवी व सहावी- ५० गुण तर सातवी व आठवी- ६० गुण

११)       चाचण्या कोणत्या इयत्तांसाठी असतील?

उत्तर  : पायाभूत चाचणी इयत्ता दुसरी ते आठवी तर संकलित चाचण्या इयत्ता पहिली ते आठवी

१२)       चाचण्या कोणत्या विषयांसाठी असतील?

उत्तर  : सन २०१५-१६ मध्ये प्रथम भाषा व गणित विषयांसाठी

१३)       चाचण्या कोणत्या व्यवस्थापन, बोर्ड व माध्यमांच्या शाळांसाठी लागू राहतील?

उत्तर  : चाचण्या राज्यातील सर्व व्यवस्थापन, बोर्ड व माध्यमांच्या शाळांसाठी लागू राहतील

१४)       चाचण्या कोण घेणार?

उत्तर  : वर्गशिक्षक

१५)       चाचण्यांसाठी प्रश्नपत्रिकांची निर्मिती कोण करणार?

उत्तर  : शिक्षक ,पर्यवेक्षीय अधिकारी,शिक्षणतज्ञ व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने  महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे (विद्यापरिषद)

१६)      सर्व व्यवस्थापन , माध्यम व बोर्डांच्या शाळांसाठी एकाच प्रकारच्या प्रश्नपत्रिका असतील का?

उत्तर  : होय

१७)      प्रश्नपत्रिकांची निर्मिती करताना ग्रामीण आणि शहरी भाग स्वतंत्रपणे विचारात घेतला आहे का?

उत्तर  : होय. प्रथम भाषेच्या इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी

१८)       चाचणी बाबत व प्रश्नांच्या स्वरूपाबाबत अधिकची स्पष्टता कोठे मिळेल?

  उत्तर  : या संदर्भात दिनांक ७ जुलै २०१५ चे शासन परिपत्रक वाचावे.

१९)      चाचण्या पाठ्यांशावर आधारित असतील की क्षमतांवर आधारित असतील?

उत्तर  : प्रश्न क्षमतांवर आधारित असतील.

२०)      शाळेची श्रेणी कशी ठरविणार ?

उत्तर  : सर्व मुलांच्या गुणांवरून शेकडा प्रमाण विचारात घेऊन श्रेणी निश्चित केली जाईल.

२१)      शाळेची श्रेणी निश्चित करताना माझी समृद्ध शाळा व ग्रामविकास विभागाचे मूल्यमापन श्रेणीचा विचार केला जाणार का?

उत्तर  : नाही.

२२)      सेमी इंग्रजी वर्गाच्या चाचण्या घेताना गणित विषयाची चाचणी कोणत्या भाषेतून घ्यावी?

उत्तर  : इंग्रजी

२३)      चाचण्या घेताना एका वर्गाचा शिक्षक दुसऱ्या वर्गावर पाठवायचा का?

उत्तर  : नाही

२४)      चाचण्या घेण्यासाठी विद्यार्थांची बैठकव्यवस्था वेगळी असावी का?

उत्तर  : नाही.

२५)      राज्यात चाचणी एकाच दिवशी घ्यायची का?

उत्तर  : विद्यापरिषदेने निर्धारित केलेल्या कालावधीत कोणत्याही दिवशी चाचणी घेण्यात येईल.

२६)      चाचणी दिवशी काही कारणांनी विद्यार्थी गैरहजर राहिल्यास त्या विद्यार्थ्याची नंतर चाचणी घ्यायची का?

उत्तर  : निर्धारित कालावधीत कोणत्याही दिवशी चाचणी घेण्यात येईल.

२७)      एखाद्या विद्यार्थ्याची पायाभूत चाचणी एका शाळेत घेतली अन काही कारणांस्तव त्या विद्यार्थ्याची शाळा बदलली तर त्याची संकलित चाचणी कोणत्या शाळेने घ्यायची?

उत्तर  : संकलित चाचणीच्या वेळी विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेने चाचणी घ्यावी.

२८)      पायाभूत चाचणी नंतर विद्यार्थी दुसऱ्या शाळेत गेला तर दुसऱ्या शाळेने त्याची पायाभूत चाचणी पुन्हा घ्यायची का?

उत्तर  : नाही.

२९)       एखादा विद्यार्थी पायाभूत चाचणीच्या वेळी गैरहजर असेल अन त्यानंतर तो एकदम संकलित १ चाचणीच्या वेळी हजर राहिला तर त्याची पायाभूत व संकलित १ अशा दोन्ही चाचण्या घ्यायच्या का?

उत्तर  : नाही. मात्र संकलित चाचणी १ घेण्यात यावी.

३०)      संचयी नोंद पत्रिकेत विद्यार्थ्याचे पायाभूत चाचणीचे गुण लिहायचे का?

उत्तर  : नाही.

३१)      नसल्यास ,गुण नोंदविण्याची कार्यपद्धती काय राहील?

उत्तर  : सरल संगणक प्रणालीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद करण्यात येईल.

३२)      चाचण्या कोण तपासणार?

उत्तर  : वर्गशिक्षक/ विषय शिक्षक

३३)      तीनही प्रकारच्या चाचण्यामध्ये मुल अप्रगत आढळल्यास त्याला त्याच वर्गात ठेवायचे का?

उत्तर  : नाही.

३४)      शाळाबाह्य मुलांच्या चाचण्या घ्यायच्या का?

उत्तर  : होय

३५)      होय असल्यास कशाप्रकारे घ्यायच्या?

उत्तर  : शाळाबाह्य मुलाला नियमित शाळेत दाखल करून चाचण्या घेण्यात येतील.

३६)      पायाभूत चाचणीसाठी येणारा खर्च कोण पुरविणार ?

उत्तर  : प्रश्नपत्रिका छपाई व पुरवठा यासाठीचा खर्च राज्यशासन करेल.

३७)      प्रश्नपत्रिकांची छपाई व पुरवठा कोणामार्फत करण्यात येईल?

उत्तर  : विद्यापरिषद ,पुणे

३८)      ४० % पेक्षा कमी गुण असणारे मुल शिकण्यासाठी काय करावे?

उत्तर  : आधुनिक अध्ययना अध्यापन पद्धतीवर विशेष कृती कार्यक्रम विकसित करावा.

३९)      वर्गाची गुणवत्ता ठरविताना सतत गैरहजर विद्यार्थ्यासह वर्गाची गुणवत्ता काढायची का?

उत्तर  : होय

४०)      एखाद्या वर्गामुळे शाळेची श्रेणी घसरत असेल तर त्या शिक्षकावर कारवाई होणार का?

उत्तर  : नाही.

४१)      अप्रगत मुलांसाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन केले जाणार आहे का?

उत्तर  : नाही

४२)      संपूर्ण वर्ग किंवा शाळा  प्रगत झाल्यास शिक्षकांचा व मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा लागेल काय?

उत्तर  : नाही.

४३)      अप्रगत विद्यार्थी प्रगत करण्याचे काम कोण करणार?

उत्तर  : वर्गशिक्षक

४४)      अप्रगत विद्यार्थांना प्रगत करण्यासाठी शासन वेगळ्याने काही कार्यक्रम राबविणार आहे काय?

उत्तर  : नाही.

४५)      अप्रगत विद्यार्थ्यांसाठी ज्यादा तास घ्यावे लागतील काय ?

उत्तर  : नाही.

४६)      विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरून शिक्षक , मुख्याध्यापक व पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहले जाणार काय?

उत्तर  : होय

४७)      अप्रगत विद्यार्थ्याना प्रगत करण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येणार आहे काय?

उत्तर  : नाही.

४८)      अप्रगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शासनाकडून पुस्तिका किंवा काही साहित्य मिळणार आहे काय?

उत्तर  : नाही.

४९)      अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी कोणते साहित्य वापरावे ?

उत्तर  : शाळांमध्ये उपलब्ध असलेले व यापूर्वी शासनाकडून पुरविण्यात आलेले शैक्षणिक साहित्य.

५०)      : सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात  विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीचे कटी टक्के उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे?

उत्तर  : १० %

५१)      राज्यस्तरावर दोन प्रकारचे कोणते अहवाल संकलित केले जातील?

उत्तर  : १) निष्पती अहवाल २) प्रक्रिया अहवाल

५२)      निष्पती अहवाल व प्रक्रिया अहवाल शासनास सादर करण्याची जबाबदारी कोणत्या संस्थेची आहे ?

उत्तर  :विद्यापरिषद ,पुणे

५३)      अप्रगत विद्यार्थी प्रगत करण्यासाठी कोणती पद्धती उत्कृष्ट आहे?

उत्तर  : ज्ञानरचनावादास धरून बहुवर्ग बहुस्तर अध्यापन

५४)      शिक्षकांनी कोणत्या बाबींमध्ये सक्षम राहणे आवश्यक आहे?

उत्तर  : विषयज्ञान , अध्यापन पद्धती व बालमानसशास्त्र

५५)      शिक्षकांना समृद्ध करण्यासाठी कोणत्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे?

उत्तर  :शिक्षकांच्या मागणीनुसार प्रशिक्षण

५६)      भाषा व गणित विषयाचे उत्कृष्ट प्रशिक्षक कोठून मिळणार आहेत?

उत्तर  : सन २०१५-१६ मध्ये दिनांक २१ एप्रिल २०१५ च्या शासन निर्णयानुसार निवड करण्यात आलेल्या नवोपक्रम शाळांमधून

५७)      त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यमापन म्हणजे काय?

उत्तर  : स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मूल्यमापन

५८)      त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यमापन घेणे म्हणजे शिक्षकांवर अविश्वास दाखविल्यासारखे होत नाही का?

उत्तर  : नाही,

५९)       त्रयस्थ संस्थेची निवड कशी होणार?

उत्तर  : विद्यापरिषदेकडून या कामाचा अनुभव असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे अर्ज मागवून विहित प्रक्रियेद्वार निवड करण्यात येईल.

६०)      त्रयस्थ संस्थेच्या मुल्यामापनासाठी शाळांची निवड कशी करणार?

उत्तर  : यादृच्छिक (random)पद्धतीने

६१)      वर्गशिक्षकाने घेतेलेल्या पायाभूत चाचणी व त्रयस्थ संस्थेद्वारा घेतलेल्या संकलित चाचणी १ किंवा २  मधील मुलांच्या गुणांमध्ये तफावत आढळल्यास वर्गशिक्षकांवर कारवाई होणार का?

उत्तर  : नाही.

६२)      त्रयस्थ संस्था त्यांच्या स्वत:च्या प्रश्नपत्रिका वापरून चाचणी घेणार का?

उत्तर  : नाही

६३)      मुलांना शिकविण्याची पूर्ण जबाबदारी कोणाची?

उत्तर  : शिक्षकांची

६४)      शिक्षकांना कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य असेल?

उत्तर  : वर्गामध्ये शिकविण्याची पद्धत , साहित्य इत्यादी बाबत

६५)      अप्रगत विद्यार्थ्यांना काय अध्यापन केले जाते याचे पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून वेळोवेळी पर्यवेक्षण होणार आहे का?

उत्तर  : नाही.

६६)      गुणवत्ता वाढीसाठी पर्यावेक्षानाच्या दृष्टीने पोषक घटक कोणते ?

उत्तर  : मदत , समुपदेशन , सुलभीकरण ,मेंटरिंग

६७)      पर्यवेक्षीय यंत्रणेने मुलांची गुणवत्ता कशी तपासावी?

उत्तर  : मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधून

६८)                              वर्गाची व शाळेची वार्षिक तपासणी पूर्वीच्याच पद्धतीने होणार का?

उत्तर  : नाही.

६९)      प्रथम भाषा व गणित विषयांचे आकारिक मूल्यमापन करायचे का?

उत्तर  : होय

७०)      आकारिक मूल्यमापनाच्या नोंदी करायच्या का?

उत्तर  :होय

७१)      अप्रगत विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना साधारण व प्रगत मुलांकडे लक्ष देण्यासाठी कोणती पद्धती योग्य राहील ?

उत्तर  : बहुस्तर

७२)      एकाच शिक्षकाने एकापेक्षा अधिक  वर्गांना अध्यापन करण्यासाठी कोणती पद्धती योग्य राहील?

उत्तर  : बहुवर्ग

७३)      शिक्षकाला प्रशिक्षणाची मागणी कोणाकडे नोंदवावी?

उत्तर  : केंद्रप्रमुख

७४)      प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका काय असेल?

उत्तर  : शिक्षकांना आवश्यक तेथे मदत आणि या कार्यक्रमाबाबत पालक व समाजामध्ये जागृती

७५)      शासन कोणत्या शाळांना tablet देणार ?

उत्तर  : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना

Thursday, September 1, 2016

ज्ञानरचनावाद काय आहे ....काय नाही

ज्ञानरचनावाद.... काय आहे आणि काय नाही? tगेल्या काही वर्षांत शिक्षणाच्या क्षेत्रात, विशेष करून प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात ज्ञानरचनावादाचा बराच बोलबाला आहे. रचनावाद, रचनावादी शिक्षणपद्धती असे शब्द वारंवार कानी पडतात. अनेकदा असे अनुभवास येते की या शब्दांचा अर्थ प्रत्येक जण आपल्याआपल्या सोयीने लावत असतो. शाळेत साधने वगैरे वापरून कृतियुक्त शिक्षण देणारे रचनावादाचे पुरस्कर्ते ‘आमच्या शाळेत आम्ही रचनावादी पद्धत वापरतो’ असे अभिमानाने म्हणताना दिसतात तर ‘रचनावाद येण्याआधी पासून आम्ही तुम्ही सांगता त्या गोष्टी करतच होतो, तुम्ही त्याला फक्त नाव दिलेत’ असे काहीजण म्हणताना दिसतात. काहीजण ‘वर्तनवाद’ विरुद्ध ‘रचनावाद’ अशी मांडणी करताना दिसतात. या मतमतांतरांमुळे बर्‍याच जणांचा गोंधळ होणे साहजिक आहे. त्यातून या विषयावर मराठीतून फारसे वाचायलाही मिळत नाही. म्हणून या लेखात रचनावादाची नेमकी संकल्पना काय आहे याची तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. इथे एक बाब लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे, ही केवळ तोंडओळख आहे. या विषयाची व्याप्ती बरीच मोठी असल्याने अधिकचे वाचन करून, सहकार्‍यांंशी चर्चा करून रचनावादाची पुरेशी सखोल समज बनवणे शिक्षक़ांसाठी अत्यावश्यक आहे. रचनावाद हा मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकणारा एक सिद्धांत आहे. माणसाचे मूल कसे शिकते, या जुन्याच प्रश्नाचे नवे, अधिक विस्तृत उत्तर देण्याचा प्रयत्न रचनावादाने केला आहे. मात्र अजूनही या प्रश्नाचे परिपूर्ण उत्तर आपल्या हाती आले आहे असे नाही. मात्र नवनव्या संशोधनांतून या विषयीच्या आपल्या ज्ञानात नित्यनेमाने भर पडत आहे हे नक्की. मुलांच्या शिकण्याबाबत रचनावादाचे काय म्हणणे आहे हे पाहण्याआधी, आपण शिकण्याबाबतचे रचनावादाच्या आधीचे सिद्धांत काय होते हे पाहणे गरजेचे आहे. ‘मुलाचे मन म्हणजे कोरी पाटी त्यावर आपण हवे ते लिहू शकू’ (याचेच दुसरे रूप म्हणजे ‘मूल म्हणजे मातीचा गोळा’) असा सिद्धांत अनेक वर्षे रूढ होता. अजूनही त्याचे पडसाद कुठे क़ुठे ऐकायला मिळतातच. बाहेरच्या जगाचे प्रतिबिंब किंवा छाप मुलाच्या ‘रिकाम्या’ मनावर उमटणे म्हणजे मूल शिकणे अशी कल्पना अनेक दिवस सर्वमान्य होती. पण हळूहळू लक्षात आले की प्रत्येक मुलाला ‘आपल्याला हवे ते, हवे तसे, हवे तेव्हा’ शिकवता येईलच असे नाही. एकाच वातावरणात वाढणारी किंवा एकाच शिक्षकाकडून शिकणारी सगळीच मुले सारखी शिकत नाहीत. जर मुलांची मने म्हणजे कोर्‍या पाट्या असत्या तर मुलांच्या शिकण्यात असा फरक पडायचे कारण नाही ! वर्तनवादाचा सिद्धांत - स्वरूप आणि मर्यादा मुलांच्या शिकण्याबाबतच्या अजून एका सिद्धांताचे अधिराज्य शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक वर्षे राहिले. तो म्हणजे वर्तनवादाचा सिद्धांत. आजही शिक्षणशास्त्राच्या अभ्यासक्रमात हा सिद्धांत विस्ताराने अभ्यासला जातो. मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ही व्याख्या लोकांना भोंगळ वाटायला लागली कारण मनाच्या अस्तित्वाचा व स्वरूपाचा पुरावा देणे शक्य नव्हते. बारकाईने बघितले तर आपण एखाद्याच्या मनाबाबत जे आडाखे बांधतो ते त्याच्या वर्तनाच्या आधारे बांधतो. (उदाहरणार्थ, नितीनचे मन उदास आहे याचा आडाखा आपण ‘तो तोंड पाडून बसलाय’ ‘बोलत नाहीये’ असे त्याचे वर्तन पाहून बांधतो! कारण वर्तनाचे त्रयस्थपणे निरीक्षण करता येते.) त्यामुळे मग ‘वर्तनाचा अभ्यास करणे म्हणजे मानसशास्त्र’ अशी व्याख्या केली जाऊ लागली. या व्याख्येच्या शास्त्रीय असण्याचा दबदबा इतका होता की मानसिक अवस्था वा प्रक्रियांबद्दल बोलणे अशास्त्रीय गणले जाऊ लागले. वर्तनाचा अभ्यास करण्याच्या काळात प्राण्यांचे वर्तन अभ्यासण्याचे अनेक प्रयोग मानसशास्त्रज्ञांनी केले आणि प्राण्यांचे वर्तन आपल्याला हवे तसे बदलता येते हे सिद्ध करून दाखवले. वर्तनात बदल घडवण्याचे त्यांचे साधन होते बक्षिसे आणि शिक्षा ! एखादे वर्तन केल्यावर बक्षीस मिळाले तर प्राणी ते वर्तन पुन्हा पुन्हा करतो आणि शिक्षा मिळाली तर ते वर्तन करत नाही अशी ही ढोबळ व सहज दिसणारी मांडणी होती आणि म्हणून मग ‘मुलाच्या वर्तनात शिक्षकाला अपेक्षित बदल घडणे म्हणजे शिकणे’ अशी आपल्याला सुपरिचित असलेली शिकण्याची व्याख्या अस्तित्वात आली. वर्तनातील हा बदल कायमस्वरूपी टिकावा यासाठी पुन्हा पुन्हा सराव करणे गरजेचे आहे हेही लक्षात आले. प्राणिल स्वरूपाच्या गोष्टी मूल कसे शिकते हे सांगण्यात वर्तनवाद कमालीचा यशस्वी झाला. मात्र माणसाच्या मुलाचे शिकणे प्राण्यांपेक्षा कमालीचे गुंतागुंतीचे असते. त्याचे समग्र स्पष्टीकरण वर्तनावादाच्या आधारे करणे कठीण होऊ लागले. मूल मातृभाषा (खरे तर परिसर भाषा म्हणायला हवे !) कशी शिकते हे सांगताना वर्तनवादी सिद्धांत अगदीच तोकडा पडू लागला. माणसाची भाषा ही एक अत्यंत गुंतागुंतीची चिन्हप्रणाली आहे. जगातल्या खर्‍या वस्तू, क्रिया, भावना, वस्तूचे गुणधर्म असे बरेच काही शब्दांच्या चिन्हांनी आपण दाखवत असतो. भाषेतील शब्द आणि तिच्या व्याकरणाचे नियम वापरून आपण मनातल्या मनात विचार करू शकतो. मातृभाषेचे नियम, व्याकरण, जटिल वाक्य-रचना एखादे दोनतीन वर्षांचे मूल कसे शिकते, भाषा वापरून आपण विचार कसा करू शकतो, याचे उत्तर वर्तनवादी सिद्धांताला देता येईना. वर्तनवादी शास्त्रज्ञ भाषेकडे आणि विचारप्रक्रियेकडे फक्त एक वर्तन म्हणून पाहत असत. कारण विचार-प्रक्रिया अभ्यासायची तर मनाचे आणि मानसिक प्रक्रियांचे अस्तित्व मान्य करायला लागणार आणि ते नाकारूनच तर वर्तनवादाची सुरुवात झाली होती! या प्रश्नावर तोडगा म्हणून आकलनवादी विचार मांडले गेले. ‘मूल भाषा कशी शिकते, हे केवळ अभिसंधान प्रक्रिया वापरून स्पष्ट करणे अशक्य आहे’ अशी मांडणी नोआम चॉम्स्कीसारख्या भाषातज्ज्ञाने केली. माणसाची विचारप्रक्रिया म्हणजे वर्तन नाही, तर विचारप्रक्रियेचा प्रभाव वर्तनावर पडतो. विचार- प्रक्रिया ही मानसिक पातळीवर चालणारी क्रिया असल्याने, आकलनवादासोबत मानसिक-अवस्था व मानसिक-प्रक्रिया यांना मानसशास्त्राच्या अभ्यासात परत स्थान मिळाले. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की आकलनवाद्यांनी वर्तनवाद पूर्णपणे नाकारलेला नाही, मात्र तो शिकण्याची समग्र प्रक्रिया उलगडण्यास तोकडा आहे, असे सप्रमाण दाखवून दिले आहे. मानसिक पातळीवरील कल्पना प्रक्रिया यांचा अभ्यास करणे मानसशास्त्रात पुन्हा एकदा दाखल झाल्यावर, शिकण्याची प्रक्रिया काय आहे हे उलगडून दाखवण्याला बराच वेग आला. त्यातूनच ज्ञानरचनावादाची कल्पना पुढे आली. मूल आपल्या मनातील जगाबाबतच्या धारणा (ीलहशार) आणि परिसरातून मिळणारा अनुभव यांच्यातील आंतरक्रियेतून स्वत:च्या ज्ञानाची रचना करत असते असा रचनावादाचा मध्यवर्ती विचार आहे. मूल आपल्या ज्ञानाची रचना कशी करते यावर ज्ञानरचनावाद बराच प्रकाश टाकतो. मूल अगदी जन्मापासून अवतीभोवतीचे जग समजून घेण्याचा प्रयत्न करते. वस्तू मुठीत पकडणे , तोंडात घालणे, वस्तू एकटक न्याहाळणे ही मुलाची जग समजून घेण्याची धडपड आहे असे ज्ञानरचनावादात मानले जाते. एकदा का मुलाला भाषा अवगत झाली की ज्ञानाची रचना करण्याला मोठीच गती मिळते. शब्दांच्या आधारे मूल नव्या नव्या धारणा बनवते आणि अनुभव वाढला की बनलेल्या धारणा मोडून पुन्हा नव्याने बनवते. ‘पुरुष’ या शब्दाची एका मुलाची धारणा वाढत्या अनुभवाबरोबर कशी बदलत जाऊ शकते, याचे पियाजेंनी दिलेले उदाहरण आपण पाहू या. अर्थातच एका अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रियेचे हे काहीसे ढोबळ वर्णन आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. १. सुरुवातीला ‘बाबा’ या शब्दाचा अर्थ पुरुष या शब्दासारखाच असतो. त्यामुळे सर्व पुरुषांसारख्या दिसणार्‍या व्यक्तींना मूल बाबा म्हणते. २. हळू हळू त्यातून आजोबा, दादा असे वयानुसार पडणारे काही गट वेगळे होतात. मग त्या त्या वयोगटातील व्यक्तींना मूल दादा वा आजोबा म्हणू लागते. या टप्प्यावर पुरुष या धारणेत किमान आजोबा, बाबा व दादा असे तीन गट आहेत. ३. काका, मामा अशी नाती लक्षात येऊ लागली म्हणजे मुलाची पुरुष या गटाची धारणा अधिक विस्तारते.
४. हळू हळू वाढत्या अनुभवाबरोबर पुरुष या शब्दाची मोठ्या माणसांच्या धारणेसारखी धारणा मूल बनवते.
मुलाने संकल्पना बांधण्याची ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आता वर्तनवादी दृष्टिकोनातून वरील घटना पाहायची झाली तर बाबा, दादा, आजोबा या शब्दांचे (खरे तर आवाजांचे) अभिसंधान वेगवेगळ्या वयाच्या व्यक्तींशी होते व त्यातून मूल हे वेगवेगळे शब्द उच्चारते असे म्हणावे लागेल. पण असे सुटे सुटे शब्द उच्चारणे हे काही मुलाची नात्यांबाबतची समग्र समज दाखवत नाही. मुलाच्या शिकण्याची प्रक्रिया उलगडण्यासाठी वर्तनवाद तोकडा पडतो म्हणजे काय याची या उदाहरणावरून कल्पना यावी.
महत्त्वाचा मुद्दा असा की ज्ञानरचनावादात मुलांच्या अनुभवाला शिकण्याच्या प्रक्रियेत मध्यवर्ती स्थान आहे. समृद्ध अनुभवांखेरीज मुले ज्ञानाची रचना करणार नाहीत असा ज्ञानरचनावादाचा विश्वास आहे. म्हणूनच अनेकदा हाताने करून शिकणे प्रभावी ठरते असा आपला अनुभव आहे. मात्र ज्ञानरचनावादी दृष्टीने शिकवण्यासाठी नेहमीच काही तरी हाताने करणे गरजेचे आहे हापण एक गैरसमज आहे. किंवा हाताने काहीतरी करायला दिले म्हणजे ज्ञानरचनावादी दृष्टीने शिकवले असे होत नाही. ज्ञानरचनावादी दृष्टिकोन विकसित झाला म्हणजे शिक्षकांच्या शिकवण्यात एक नेमकेपणा येतो, प्रत्येक मुलाची ज्ञानरचनेची प्रक्रिया वेगळी असल्याचे लक्षात आल्याने शिकवण्यात जी लवचीकता येते हे महत्त्वाचे आहे.
अजून एक महत्त्वाचा मुद्दा ज्ञानरचनावादातून पुढे येतो. तो म्हणजे मुलांच्या धारणा एकदम बनत नाहीत तर त्या बनतात, मोडतात आणि पुन्हा नव्याने बनतात. त्यामुळे आपण जसे सांगू तसेच्या तसे मूल ग्रहण करेल अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरते. इयत्ता आठवीत मुलाने तयार केलेली सूर्यमालेसारखी अणूची धारणा (म्हणजे मधे केंद्रक आणि भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन अशी) आणि प्रत्यक्ष अणूची रचना यात मोठेच अंतर आहे. पण म्हणून आपण आठवीच्या मुलाची धारणा चुकीची म्हणत नाही. तर अणूची संकल्पना समजून घेण्यातली ती एक अनिवार्य पायरी मानतो. म्हणजेच ज्ञानरचनावादात मुलांच्या तथाकथित चुकांकडे शिकण्यातली एक पायरी म्हणून बघितले जाते.
आत्तापर्यंत केलेल्या विवेचनावरून कुणी विचारेल, ‘जर मूल स्वत:च ज्ञानाची रचना करणार असेल तर शिकवणार्‍यांचे काय काम?’ मात्र हा ज्ञानरचनावादाचा विपर्यास होईल. ज्ञानरचनावादात मोठ्यांसोबतच्या आंतरक्रियेलाही महत्त्वाचे स्थान आहे. ज्ञानरचनावाद ही संकल्पना जशीजशी विकसित होत गेली तसेतसे मोठ्यांच्या सहभागाचे महत्त्व अधिकाधिक पुढे आले. भाषा हे महत्त्वाचे साधन बर्‍याच प्रमाणात मोठ्यांशी झालेल्या आंतरक्रियेतूनच मुलांना मिळते. मूल ज्या समाजात वाढते त्या समाजातून मिळालेली भाषा हा मुलांच्या ज्ञानरचनेतील महत्त्वाचा घटक आहे.
तसेच एखाद्या मुलाची ज्ञानाची सध्याची धारणा लक्षात घेऊन तिथून कोणत्या नव्या धारणेपर्यंत मूल मोठ्यांच्या मदतीने पोहचू शकेल याचा अंदाज शिकवणार्‍याला घ्यावा लागतो.
ज्ञानरचनावादाचे काही पैलू आपण पाहिले. ते एका दृष्टिक्षेपात पुढीलप्रमाणे मांडता येतील.
१. मुले आपल्या ज्ञानाची रचना स्वत: करतात. या रचनेसाठी त्यांना विविध समृद्ध अनुभव मिळणे गरजेचे आहे.
२. ‘हाताने करून शिकणे’ हा ज्ञानरचनावादातील महत्त्वाचा भाग आहे.
३. मुलांच्या चुकांकडे त्यांच्या शिकण्यातली महत्त्वाची पायरी म्हणून पाहायला हवे. ज्ञानरचनावादात मुलांच्या व्यक्तिगत विचाराला आदराचे स्थान आहे.
४. मुलांच्या ज्ञानरचनेत मोठ्यांच्या सहभागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलाला शिकण्याच्या विशिष्ट टप्प्यावर काय आणि कशी मदत करावी याचे भान शिकवणार्‍या माणसाला असावे लागते.
ज्ञानरचनावाद हा शिकण्याबाबतचा सिद्धांत बराच प्रगत असला तरी तो शिकण्याच्या प्रक्रियेचे समग्र वर्णन करत नाही. शिकण्याच्या इतर सिद्धांतांप्रमाणेच तोही एक आंशिक सिद्धांत आहे. पण मुलांच्या शिकण्याचे बरेच नवे आयाम या सिद्धांतामुळे आपल्यासमोर आले हे खरे. शिकवताना शिक्षकाला अनेक सिद्धांतांचा एकत्र आधार घेऊन शिकवावे लागते. हे वास्तव लक्षात घेता शिकण्याबाबतचे सर्वच सिद्धांत अभ्यासून, पचवून डोळसपणे शिकवता येणे हे चांगल्या शिक्षकाचे लक्षण आहे.
नीलेश निमकर
‘क्वेस्ट’ या शिक्षणसंस्थेचे संचालक, गेली वीस वर्षे आदिवासी मुलांसाठी भाषा आणि गणित विषयांमधले काम. राज्य शिक्षण संस्थेत शैक्षणिक सल्लागार म्हणून कार्यरत.
1. पिंजर्‍यात बंद असणार्‍या एखाद्या उंदराला ‘कळ दाबल्यावर अन्न मिळते’ हे अपघाताने समजले, तर तो हवे तेव्हा कळ दाबून अन्न मिळवायला शिकतो. कळ दाबणे हे वर्तन अन्नाच्या बक्षिसामुळे उंदीर पुन्हा पुन्हा करतो. काही काळाने जर वारंवार कळ दाबून अन्न मिळाले नाही तर तो कळ दाबणे बंद करतो. कळ दाबणे आणि अन्न मिळणे यात जो संबंध जोडला जातो त्याला अभिसंधान किंवा Conditioning असे म्हणतात.वर्तनवाद्यांच्या मते अभिसंधान ही शिकण्यातील प्रमुख प्रक्रिया आहे.
2. तीन वर्षांच्या आयुषचे हे वाक्य पाहा - ‘इथे झुरळ मरले आहे बघ.’ या क्रियापदाचे ‘मरले’ असे भूतकाळातील रूप केले आहे. अर्थातच त्याच्या आसपासचे कोणीच हे रूप वापरत नाही. सगळेजण ‘झुरळ मेले’ असे रूपच वापरतात. मात्र लहानग्या आयुषच्या मनात मराठीचे व्याकरण आकार घेते आहे, त्यामुळे त्याने बसले, उठले यासारखे मरले असे रूप बनवले आहे. कोणीही कधीही न वापरलेले हे क्रियापदाचे रूप आयुषला कसे सुचले याचे स्पष्टीकरण वर्तनवादी सिद्धांताच्या आधारे देता येत नाही.
3. सहावीच्या वर्गात गुरुजींनी ऋण संख्या शिकवल्या, पूर्णांक संख्यांची बेरीज-वजाबाकी शिकवली आणि मुलांना उदाहरणे सोडवायला दिली. त्यांना असे दिसले की बर्‍याच जणांचा ऋण संख्यांच्या बेरीज-वजाबाकीत तर गोंधळ उडालाच, पण गंमत म्हणजे ४-३ =? यासारख्या उदाहरणातही मुलांनी चुका केल्या होत्या. इयत्ता सहावीत येईपर्यंत सहजपणे येणार्‍या वजाबाकीत मुलांनी का चुका केल्या ? आतापर्यंत नैसर्गिक संख्याच्या आधारे वजाबाकीची जी धारणा मुलांनी बनवली होती ती पूर्णांक संख्यांच्या वजाबाकीच्या नियमांमुळे मोडून पडली आणि त्यामुळे आता वजाबाकीची नवीन धारणा बनेपर्यंत मुलांचा स्वाभाविकपणेच गोंधळ झाला. ही नवी धारणा बनेपर्यंत मुलांना वेळ द्यायला हवा असे ज्ञानरचनावादावर विश्वास असणारा शिक्षक़ म्हणेल.
4. उदाहरणार्थ एखादे मूल अपूर्णांक शिकते आहे. अपूर्णांकांची मूलभूत कल्पना (आकृती पाहून अपूर्णांक लिहिणे वगैरे), अपूर्णांकाचे वाचन, लेखन या बाबी त्याला स्वतंत्रपणे येत असल्या तरी दोन अपूर्णांकांमधला लहान मोठेपणा ठरवायला त्याला लगेच जमेल असे नाही. काही दिवस निरनिराळ्या अपूर्णांकांच्या जोड्यांवर शिक्षकांच्या मदतीने, शैक्षणिक साधने वापरून काम केले म्हणजे मग लहान-मोठेपणा ठरवणे मुलांना शक्य होऊ लागते.

आधार कार्ड माहिती upload करणे

🔵 *आधार माहिती बाबत आज शेवटची पोस्ट*🔵
*(काळजीपूर्वक वाचा. आवडली तर दुसर्‍या ग्रुपवर नक्कीच शेअर करा.)*
     🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
        🙏� *आपलाच तंत्रस्नेही मित्र* 🙏�
              *शिवाजी नवाळे सर*
                  *राहुरी अ'नगर*
      *प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह प्रमुख*
           🔵🔶🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
*मित्रांनो नमस्कार*
        *मित्रांनो गेल्या 10 दिवसात आपल्या सर्व शिक्षक बंधूभगिनींना आधारकार्ड माहिती सहज सोप्या पद्धतीने भरता यावी यासाठी मी 5 पोस्ट टाकल्या. या पोस्टचा उद्देश एकच होता की माझ्या बांधवांना आधार माहिती भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये.*
         *मित्रांनो या पोस्ट संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या. आणि मेसेज, फोनच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येने प्रतिक्रिया मला मिळाल्या. यामध्ये सहज सुलभतेने माहिती भरता आली यापासून तर अनेक अडचणी कशा दूर कराव्यात अशा प्रतिक्रियांचा त्यामध्ये समावेश होता.*
         *मित्रांनो मी तुमच्यासारखाच एक साधा शिक्षक आहे. माझ्या परीने मी एक साधा प्रयत्न केला. त्याला एवढा प्रतिसाद मिळेल याची कल्पनाही मी केली नव्हती. मित्रांनो या पोस्ट ने गेल्या 10 दिवसात मला प्रचंड संख्येने फोन केला आले. माझ्या परीने शक्य होईल तेव्हा या फोन कॉल्स ला उत्तरे दिली. माझ्या पोस्ट ला आपण जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अत्यंत नम्रतापूर्वक आभार मानतो.*
           *एवढ्या पोस्ट केल्या पण अजूनही आधार बाबतीत काही मित्र शॉर्ट कट वापरून माहिती भरण्यासाठी प्रयत्न करतात आणि मग त्याचा परिणाम आधार फाईल अपलोड करताना Error येत आहे. म्हणून ही पोस्ट टाकण्याची वेळ आली. पण काही हरकत नाही. खाली देत असलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचा आणि येत असलेल्या Error वर मात कराल अशी आशा आहे.*

    *आधार डाउनलोड फाईल भरतांना घ्यायची काळजी*

1)  *सर्वप्रथम 'J' कॉलम सिलेक्ट करून Format cell ची प्रोसेस नीट झाली आहे याची खात्री करा. प्रोसेस नीट झाली नाही तर अंक सलग न दिसता 2.456+ असे दिसतात.*

2) *आधार अंक स्पेस न देता सलग टाईप करा.*

3) *मुलाचे First name आधारकार्डवर उलटे असले तरी तुम्ही सोईचेच लिहा. उदा. More Ganesh असे असेल तरी first name 'Ganesh' लिहा.शिवाय वरील नावात वडिलांचे नाव नाही. मग middle name काही टाकू नका.*

4) *आधारकार्ड वर जन्मतारीख फक्त वर्ष असेल तर अजिबात भरू नका. Blank सोडा.*

5) *प्रत्येक शब्दाचे स्पेलींग्ज आधारकार्ड वर जसे आहे तसे भरा.*

6) *मित्रांनो आपल्याला माहिती भरण्यासाठी जी डाउनलोड फाईल दिली आहे. तिच्या अर्ध्या भागात मुलांची माहिती दिलेली आहे. अनेक मित्रांनी तिच माहिती copy paste केली आणि पुढील कोऱ्या भागात टाकली हा शॉर्टकट वापरल्याने फाईल अपलोड केल्यानंतर mismatch File types असा error आलेला आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत copy paste करू नका. सर्व माहिती टाईप करून भरा. मित्रांनो आपल्याला हे भरायचेच आहे तर काळजी घेतलेली चांगलीच आहे ना.*

7) *जन्मतारीख 16-08-2010 अशीच नोंदवा. 16/08/2010 अशी टाईप करू नका.*

8) *Gender टाईप करू नका. त्या कॉलम मध्ये क्लिक केले की बाजूला एक छोटासा उभा बाण दिसतो त्यावर क्लीक करून निवडा.*

9) *सर्व माहिती व्यवस्थित भरली आहे याची खात्री झाली की ती फाईल Save as करायच्या अगोदर नेहमीच्या साध्या पद्धतीने Save करा. बाहेर पडा नि त्या Save केलेल्या फाईल ची copy करून इतर Drive वर आणि pendrive यामध्ये घेऊन ठेवा. याचा उद्देश एकच आहे की नंतर Save as करून csv comma delimited केलेली फाईल अपलोड केल्यानंतर जरी फाईल Error आली तरी दुरूस्ती करण्यासाठी ही दुसरीकडे Save करून ठेवलेली फाईल उपयोगी पडेल. म्हणजेच सर्व माहिती पुन्हा एकदा भरावी लागणार नाही.*

10) *आता मुळ माहिती भरलेली फाईल पुन्हा ओपन करून Save as ची प्रोसेस पुर्ण करून फाईल अपलोड करुन टाका.*

11) *आधार माहिती कोणत्याही लिपी मध्ये भरली तरी चालेल. पण शक्यतो Capital letters मध्ये भरा.*

12) *सर्वात महत्वाची गोष्ट अर्धवट माहिती भरून फाईल Save as करू नका. काही मित्र असे करतात आणि पुन्हा राहिलेली माहिती भरण्यासाठी ती फाईल ओपन करून माहिती भरतात व फाईल अपलोड करतात. अशा वेळी फाईल टाईप आपोआप बदलून Error दाखवला जातो.म्हणून सर्व माहिती भरूनच Save as ची प्रोसेस करा.*

13) *शेवटची आणि महत्वाची गोष्ट csv comma delimited केलेली फाईल पुन्हा ओपन करून पाहू नका. Csv comma delimited केली की ती अपलोड करून टाका.*
*आपल्या आधार कामासाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.*
      🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
        🙏� आपलाच तंत्रस्नेही मित्र 🙏�
              *शिवाजी नवाळे सर*
                  राहुरी अ'नगर
      प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह प्रमुख
            *मो. नं. 7758074275*
  🔵🔶🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
*(सर्व मित्रांना एक सूचना करावीशी वाटते की ही पोस्ट नाव कट न करता forward करावी. नाव कट करून पाठवले तर मित्रांना ज्या शंका येतील त्याचे निरसन होऊ शकणार नाही)*