Saturday, July 13, 2024

कधीही न केलेली वारी

कधीही न केलेली वारी 

माझे आजोबा आणि आजी दोघेही वारकरी. आजोबांचे रोजचे अंघोळ झाल्यावर अष्टगंध, चंदन लावणे पर्वणी राहायची. लहान असताना सुटीत वडिलांच्या गावी आलो की दाढी झाल्यावर आजोबा अतिशय तल्लीन होऊन अतिशय सुरेख लावायचे ते बघताना टिळा बघायची फार मजा यायची. गळ्यात तुळशीची माळ, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा चा सातत्याने चालणारा जप यांचं अप्रूप होतं, आजही आहे. आजीच्या देवघरातील पेटीत असलेले जुनाट, सुगंधित फडताळात बांधलेल्या पुराण, पंचांग, आरती पुस्तिका आणि जाडजूड भगवद्गीता इत्यादी पुस्तकांचे सुद्धा खूप कुतूहल असायचे. शेजारच्या गल्लीतील साधू महाराजांसारख्या वेशात त्यांचे मित्र यायचे तेव्हा खूप ओव्या, भजने आणि दृष्टांत ऐकवायचे. 

हे सगळं बालपण वारकरी पंथाच्या ओझरत्या सान्निध्यात गेलं. पुढे शाळेच्या अभ्यासक्रमात संतांची कामगिरी वाचून त्यात अधिक स्पष्टता आली. ऐतिहासिक, सामाजिक दृष्टीने संताच्या कामाची जुजबी ओळख झाली. पाठ्यपुस्तकातून अभंग, ओव्या, दृष्टांत, लिळा जरी वाचण्यात आल्या तरी नोकरीला लागेपर्यंत फारसं कधी गांभीर्यानं वाचलं नाही. मधल्या काळात वेगवेगळ्या धार्मिक प्रभावात आलो सुद्धा, पण अंतिमतः कुठे मन रमले नाही. विवाहानंतर स्थिर स्थावर झाल्यावर वेगवेगळ्या व्याख्यानाच्या, पुस्तकांच्या वाचनातून संतांच्या लिखाणाचं आकर्षण वाढत राहिलं. चमत्काराची पुटं बाजूला सारून त्यांच्यातील माणूस म्हणून असलेलं महानपण हळूहळू जाणवायला लागलं.

वयाच्या हरेक टप्प्यावर पंढरीची वारी वेगवेगळ्या अंगाने उलगडत गेली. वारीतील ठसठसितपणे उमटणारे समानतेचे, भक्तीच्या समान अधिकाराचे स्वर काळजाला हात घालायला लागले. वैचारिक लेखन, वाचन यानिमित्ताने धर्माच्या नावावर चाललेला दांभिक व्यवहार बघून धर्माबद्दल जिथे नैतिक संताप अनावर व्हायला लागला, त्याचवेळी धर्म, जात, लिंग, आर्थिक स्तर या सगळ्यांना बाजूला सारणारा वारकरी पंथाबद्दल आकर्षण, ओढ वाढायला लागली.

वारीला पायी जाणाऱ्या सर्व व्यक्तींबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम वाटतं. संसार कितीही सोडायचा म्हटला तरी तो त्याचा पाश घट्ट आवळत राहतोच. त्यातून वारीसाठी एवढे दिवस काढणे अजूनही जमले नाही. प्रत्यक्ष वारीला कधीही जाता आलेच नाही. टिव्ही वर, मोबाईल वर आणि चित्रपटातून वारीचा थरार बघून आजही सर्व काही सोडून वारीला जायला जीव आसुसलेला असतो.

वारी ही फक्त पंढरपुराच्या वाटेवर असते, तिचा शेवट फक्त विठ्ठलाच्या पायी असतो, असे बिलकुल नाही. खऱ्या विठ्ठलाचा साक्षात्कार पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या भक्तिभावात, त्यांच्या सत्याच्या विश्वासात असतो. शेती, काम धंदा, नोकरी करत इमानेइतबारे सचोटीने काम करणाऱ्या हरेक व्यक्ती मध्ये हा वारकरी ठासून भरलेला मला दिसतो. माझ्या रोजच्या कामात, शिकवत असलेल्या बालगोपालामध्ये, त्यांच्या निष्पाप हसण्यात, रुसण्या फुगण्यात तो मला रोज भेटत राहतो. संत सावता महाराज यांच्या " कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी" या वचनात किती मोठा सार भरलेला आहे. 

आयुष्याच्या कुठल्या टप्यावर प्रत्यक्ष वारीला जाणे होईल, अथवा ना होईल माहिती नाही. आयुष्याच्या अंतिम वाटेवर जाताना माणसामाणसातील हा सावळा विठुराया हरघडी भेटत राहो. तुकाराम, ज्ञानोबा, एकनाथ, सावता, जनाई, चोखोबा, नरहरी....किती कितीतरी असेच संतरुपी गुणवान माणसे आयुष्यात भेटत राहोत. कधीही न केलेली ही वारी, अंतिम सत्याकडे घेऊन जावो हीच प्रार्थना. एक तरी ओवी अनुभवावी. 

लेखन - संदीप विष्णू राऊत 
raaut.sandip@gmail.com

Labels: , , ,

0 Comments:

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात .

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home