Saturday, October 28, 2023

रसरसून जगण्याचे किती बहाणे

रसरसून जगण्याचे किती बहाणे 
#हलकं_फुलकं 

पहाटे उठल्यावर एखाद्या निर्मनुष्य रस्त्यावर फिरताना पक्ष्यांचा किलबिलाट आणि कोकिळेचा मधुर आवाज ऐकायला आला, आजूबाजूला आपल्या अंगभूत सौंदर्याने नटलेल्या गवतांचे भुरभुरणारे जावळ आणि त्यावरची बिनधास्त डोलणारी गवतफुले बघितली की जगण्याची लालसा कशी उचंबळून येते. अगदी दुर्लक्षित असलेल्या शेताच्या बांधावर, पडक्या भिंतीवर, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात उमलून आलेली सदाफुलीची, रानफुलांची फुलं, हिरव्यागार वेली, माहित नसलेल्या कसल्या कसल्या जातीची फुलं जेव्हा उस्फूर्तपणे त्या विद्रूप जगाचे बगीच्यात रूपांतर करतात ते बघून जगण्याच्या ओझ्यातून मन मोकळं होतं.

निराशा दाटून आली की उगवलेला सूर्य सुद्धा मलूल वाटत असतो. तेव्हाच एखादी महम्मद रफी, किशोर किंवा मुकेशची एखादी लकेर कुठल्याश्या रेडिओ वर ऐकायला मिळते, आणि जगणं त्या क्षणापुरतं थांबून जातं. त्या अवस्थेत तिथेच कानाची मैफिल सजते. काळवेळ, स्थळाचे भान सुटते आणि तरुण किशोर वयाची एखादी गार वाऱ्याची झुळूक भूतकाळात घेऊन जाते. एखादी गुलाम अली ची गझल आपल्या भोवती वाह वाहची दाद देणारी दर्दी गर्दीचा आभास निर्माण करते. लता दीदीचे स्वर, आशा भोसले यांच्या आवाजात "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या"  सारखी लकेर जगायची उत्कट उर्मी निर्माण करते. किती सुरेल जग आहे हे संगीताचे. एका जन्मात ऐकतो म्हटलं तरीही गाण्यांचे हे अफाट मायाजाल भोगायला आयुष्य थिटे आहे. उत्तमोत्तम रागदारी, गझला, शेर, अभंग, ओव्या, भावगीतं, पोवाडे, अंगावर काटे आणणारी भीमगीतं... जात्यावरची गाणी, भुलाबाईची गाणी, भारुड, कीर्तन, कव्वाल्या, भक्तिगीतं, वाद्य संगीत....

जगायला मोठी मोठी स्वप्न, मोठ्या मोठ्या महत्त्वाकांक्षा हव्याच असं काही नसतं. आनंदी जगायला अगदी छोट्या छोट्या गोष्टी पुरेशा ठरतात. आपल्या आजूबाजूला असणारी ही माणसं आपल्या अंतरंगात किती मोठं जग साठवून असतात. त्यांच्याशी बोलायला गेलो तर ऐकता ऐकता आपलं दुःख गळून जातं. आपला अहं कमी होतो. एखाद्या ध्येयासाठी, सेवेसाठी झपाटून काम करणारी माणसं स्वतः साठी जगत नाहीत. दुसऱ्याला देण्यात, सेवेत त्यांना सुख लाभतं. त्यांची चरित्रे समजून घेण्यात केवढं सुख आहे. 

कागदावर रंग रेषांची आणि त्यातल्या कॅनव्हास चौकटीत अख्ख भावविश्व चितारणाऱ्या चित्रकाराची कला प्रत्यक्ष चित्र काढताना अनुभवली आहे का? सृजनाची त्याची प्रक्रिया बघणाऱ्याला आणि चित्र रेखाटणाऱ्या दोघांना ही प्रचंड आनंद देणारी प्रक्रिया असते. एवढं अनंत आकाश जेव्हा एखादा कुंचला कागदावर उतरवत असतो तेव्हा त्या कलेने जगण्याचा रंग तकाकी आणतो. उत्तम चित्रकाराची चित्र प्रदर्शनी बघण्यात, स्वतः जमेल तसं चित्र रेखाटण्यात रंगवण्यात किती आनंद भरून उरला आहे. तैल चित्र, जलरंग, ॲक्रालीक, पोस्टर रंग, पेन्सिल पेनाचं साधं अचूक गिरगिटणं, नेमकी व्यंगाची उणीव शोधून तेवढी व्यंगचित्रात उतरवणं. अगदी मार्मिक टिप्पणी करून वाचकांकडून दाद घेणं यात किती रस भरून उरला आहे.

माणसाचं आयुष्य हा निसर्गाचा गोड अपघात आहे. त्याला न भोगता आत्महत्या करणं, त्याला वाळवी लागल्यासारखं पोखरू देणं, उदासवाणं आणि पंचंद्रिये आकसून घेणं कितपत योग्य आहे? पुस्तके वाचायची आणि त्यातला आनंद लुटायचा म्हटलं तरी आयुष्य अपुरं पडतं. एका एका पुस्तकातून काळाचा, व्यक्तींचा, प्रदेशाचा, जात धर्माचा,  कुठल्या कुठल्या आयामांचा केवढा धांडोळा घेता येतो. किती भरभरून जगणाऱ्या लोकांना भेटता येतं? वेदनांशी नाळ जोडता येते, अशक्य स्वरूपात सुद्धा जगण्याच्या वाटा धुंडाळता येतात. कविता, ललित, नाटकं, आत्मचरित्र, कथा, प्रवास वर्णने....किती किती सुरेख मोहमयी दुनिया आहे ही.

रोजच्या खाण्यापिण्यात असलेल्या खाद्य पदार्थात एक अख्खं आयुष्य देता येईल एवढी प्रचंड विविधता आहे. जिभेचे चोचले पुरवणारी ग्रामीण, शहरी, आदिवासी, डोंगरी भागातली खाद्य विविधता. राज्याराज्यातील, देशादेशातील चवीची ही अजब दुनिया जगायला भुरळ पाडत नाही का? खाद्य पदार्थ बनवणे, खिलवणे आणि एखाद्याने बनवलेल्या खाद्य पदार्थांचे कौतुक करण्यात केवढी जगण्याची आसक्ती ठासून भरलेली आहे. माणूस चारा खाणारा प्राणी नाही, त्याला पदार्थ डोळ्यांनी, नाकांनी आणि शेवटी जिभेनी आस्वाद घेत घेत खायला आवडतं. 

संवेदनशील छायाचित्रण करताना मनाला केवढा आनंद मिळतो. माणसांची, प्रसंगांची, शहराची, फुलांची, निसर्गाची, प्राण्यांची, पक्ष्यांची, कीटकांची एकेक स्वतंत्र दुनिया आणि त्यांचे स्वतंत्र अस्तित्व कॅमेऱ्याचा डोळ्यातून बघताना स्तिमित व्हायला होतं. ऊन सावल्यांचा खेळ, पाऊस, वारा आणि डोंगर दऱ्या, प्रचंड विविधता असणारी झाड झुडपं, रोज रोज बदलणारं गूढ आकाश, समुद्र, नद्या आणि जमिनीवर तयार झालेली अद्भुत रचना. हे टिपताना एक आयुष्य कसं पुरेल? 

जगायला अजून किती बहाणे हवे? सुताराच्या कामात, कुंभाराच्या चाकावर, गवंडीच्या रचनेत, शेतातल्या बहरणाऱ्या पिकांवर, शिंप्याच्या वेल बुट्टीवर, पाणी पुरी विकणाऱ्याच्या शेव पुरीवर, जत्रेत बासुरीचे सुर काढत बासरी विकणाऱ्या त्या पोटावर....जगण्याचा केवढा आनंद भरून उरला आहे. हातपाय तुटलेले असूनही जगण्यावर प्रेम करणारा जीव, डोळे आंधळे असूनही कानातून स्पर्शातून जग साठवून ठेवणारा जीव, जगण्याची कसलीही साधने नसलेला रस्त्याच्या कडेला झोपलेला जीव आपल्याला काय सांगतो आहे? रसरसून जग, भरभरून जग. जगायला छोटंसं निमित्त पुरेसं असताना सगळं सौंदर्य भरून असलेलं जग हात जोडून तुझी वाट बघतंय. 

स्वतः साठी जग, इतरांसाठी जग, बेंबीच्या देठापासून जग. आनंदाने साजरा कर हरेक दिवस. कला, छंद, समाज कार्य, कार्य क्षेत्रातला आनंद आणि छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याची दृष्टी एकदा मिळाली तर जगणं एक उत्सव होऊन जाईल.

© संदीप विष्णू राऊत
- raaut.sandip@gmail.com
- 29.10.2023

Labels:

Tuesday, October 17, 2023

पुराण वृक्ष आणि वृक्षपुराण

पुराण वृक्ष आणि वृक्षपुराण
#हलकं_फुलकं
सुकलेल्या झाडाचं मला नेहमीच प्रचंड आकर्षण वाटत आलेलं आहे. मला आठवतं, किशोर वयात मामाकडे जिथे शिकायला होतो तेथे माझ्या अभ्यासाच्या झोपडीवजा खोलीला लागुनच असेच एक जुने, विस्तीर्ण घेर असलेलं, उंच बेढ्याचं झाड होतं. झाडाचा जीवनरस संपलेला होता. वाळलेल्या फांद्या आणि एकही पान नसलेलं ते झाड एखाद्या योग्यासारखं संसाराचा सगळा व्याप त्यागून जणूकाही योग निद्रेत पण आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या घडामोडींचा मुक साक्षीदार बनून असल्यासारखं वाटायचं.

झाडांवर मुंज्या, हडळ आणि कसले कसले अतृप्त आत्मे राहतात असे लहान असतांना खेड्यात खूप ऐकायला मिळायचं. त्या वयात ते खूप खरंही वाटायचं. रात्री वीज जाणे हा नित्याचाच भाग असायचा. अशावेळी उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर झोपायला गेलं, आणि आपण एकटेच असलो की चांदण्याच्या पार्श्वभूमीवर झाडांचे वेडेवाकडे आकार भीतीदायक वाटायचे. वडा पिंपळाच्या झाडाच्या पानांची सळसळ जणूकाही अगम्य भाषेत काहीतरी सांगते आहे असं वाटायचं. माझे मामा आणि आम्ही पाच मावश्यांची भाची मंडळी मुद्दाम त्याच झाडाखाली उन्हाळी सुट्यांत भुता खेतांच्या गोष्टी ऐकत भीतीचा रोमांच अनुभवत असू.

रस्त्याने फोटो मध्ये दिसणारं हे झाड रोजच बघायला मिळतं. त्याकडे रोज बघूनही ते कधीच जुनं भासत नाही. गाडी थांबवून त्याच्याशी हितगुज करण्याचं खूप वेळा मनात येतं ही....पण असा वेडेपणा करण्याची हिम्मत मात्र होत नव्हती, कधी वेळ मिळत नव्हता. एक दिवस थांबून त्याचे फोटो घेतले. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करण्यात लोकांना वेडसरपणा का वाटत असेल? माहित नाही. कितीतरी वर्षापासून जीवनरस संपूनही त्याच्यातला जीव तसाच आहे असाच भास होतो. त्याच्या प्राचीन वैभवाची साक्ष त्याच्या कसदार, डौलदार फांद्या देतात. हजारो हात आकाशाकडे पसरवून कसलं तरी गूढ आर्जव तो करत असावा, त्याचं त्याचं आकाश कवेत घेण्याचा अट्टाहास करत असावा. सगळं आयुष्य संपलं तरी हा अट्टाहास त्याला का सोडता आला नाही माहित नाही. त्याच्या इच्छा-आकांक्षा अधुऱ्या असाव्यात. एक कसलं तरी चमत्कारिक भूत त्याच्याही मानगुटीवर बसलेलं असावं बहुतेक....

श्रावणात बरसलेल्या पावसानं सगळं कसं मोहरुन आलेलं असतं. जिथे जमेल तिथे सगळ्या बिजांनी आपलं हिरवं घरकुल थाटलेलं असतं. जुनी झाडं सुद्धा अंग झटकून नव्या पालवीने नटून थटून मिरवत असतात. हे झाड मात्र त्याला अपवाद होतं. सृजनाची एवढी लयलूट सुरू असताना त्याला कसलाही एक साधा कोंब तरी फुटावा ना....पण नाही. एवढ्या सगळ्या हिरवळीच्या गालिच्यावर एवढीच एक काळी मातकट तपकिरी प्रतिमा वेगळंपण राखून होती. मला त्याचा हा वेगळेपणा त्याच्याबद्दल आदर, भीती आणि कुतूहल वाढवणारी वाटत होती.

एखाद्या तपस्व्याने संन्यस्त वृत्ती धारण करून ध्यान धारणेला बसावं आणि त्याच्या आजूबाजूला लडिवाळ, नाजूक हिरव्यागार आकर्षक ललनांनी त्याला वेढून घ्यावं. आपल्या कोमल मोहक फुलांनी त्याच्या अंगा खांद्यावर रुळावं, मुद्दाम जरा अंगचटीला यावं. त्याच्या रुबाबदार आकर्षक खोडांवर स्वत:ला समर्पित करावं असं काहीसं बघून वाटत होतं. तो मात्र या सगळ्या नश्वर दैहिक सुखाच्या पल्याड गेल्यासारखा.... व्रतस्थ...स्थितप्रज्ञ भासत होता.

या नवतीच्या उत्सवात जणू काही सगळ्या वेली झुडपांनी त्याला वेढून हिरवाई प्रदान केली. त्याचं हरवलेलं तारुण्य पुन्हा देऊ केलं. कधी असंही वाटून गेलं की हा सुद्धा सगळ्या सुखांमध्ये लिप्त असूनही अंतर्मनातून अलिप्त असावा. आपल्या वाळलेल्या फांद्यांनी वेलीला आधार देत त्यांचे संसार एखाद्या आजोबा सारखे सावरत असावा. त्याचं असं अचानक शुष्क होणं मात्र मनाला विनाकारण चटका लावून जात होतं. एवढ्या खोलवर ज्याच्या मुळ्यांचा शिरकाव झालेला असूनही एखादं भरल्या झाडाला कशाने असा रुक्षपणा येत असावा? कसल्या दुःखाने त्याला आतून पोखरत नेलं असावं?

माणूस असो वा निसर्ग मृत्यू ह्या शाश्वत सत्याला कुणाला टाळता आलेलं नाही. निसर्ग मात्र या निसर्ग चक्राला मनापासून स्विकारतो. फुलपाखरं मिळेल तेवढ्या आयुष्यात फुलून, आस्वाद घेऊन त्यांचं काम पूर्ण करून निघून जातात. आपल्या नियत आयुष्यात वेगवेगळ्या ऋतूत बहरून येतात, कधी पानगळ भोगतात, कधी संकटातून सावरत नव्याने घडी बसवतात.

माणूस म्हणून आपणही एक चालते बोलते झाडच तर असतो ना? जिवंत होतं तोवर आणि मृत्यू झाल्यावर सुद्धा इथल्या मातीत मिसळून नव्याने फुला-पानांतून बहरत हे झाड पुन्हा पुन्हा मला भेटत राहणार हे नक्की.

शब्दांकन - © संदीप विष्णू राऊत
raaut.sandip@gmail.com
17.10.2023 

Labels:

Wednesday, October 11, 2023

झणझणीत मिरची भाजी आणि धमाल मस्ती

झणझणीत मिरची भाजी आणि धमाल मस्ती 
#बोलगप्पा_दैनंदिनी 
लेख क्रमांक 14

शाळेत शालेय पोषण आहार नेहमीच असतो, पण बुलढाणा विशेषतः घाटाखालील पट्यात अतिशय प्रसिद्ध असलेली भाजी म्हणजे मिरची भाजी सहसा पोषण आहारात बनवत नाहीत. भाजी आणि ती ही मिरच्यांची? हे ऐकून कधीही ज्यांनी याची चव चाखली नाही त्यांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहत नाहीत. इकडे मात्र ही भाजी खूप आवडीची आहे आणि नावाप्रमाणे वाटते तेवढी तिखट खरंच नसते. 

बाहेकर सर नव्याने शाळेवर रुजू झाले आणि त्यांनी सहज एक प्रस्ताव मांडला. सर एक दिवस आपण दुपारी शालेय पोषण आहाराऐवजी मस्त मिरची भाजी बनवूया. पोळ्या मुले घरून आणतील. हवं तर साधा भात सोबतीला ठेवू. भाजी पुरुषांनी बनवायची, आणि मुलांची सुद्धा मदत घ्यायची. मग काय मुख्याध्यापक जोशी मॅडम यांनी ताबडतोब होकार दिला. जेवणानंतर वर्गात बसण्याऐवजी दुपारी दप्तरविना शाळा करूया. मी पुस्ती जोडली. बाकी सगळ्यांनी नेमकं काय करायचं यावर एकमत केलं. शाळा सुटताना नियोजन आणि जबाबदारीचे वाटप करण्यात आले. 

दुसऱ्या दिवशी सुरुवात अडचणींनी झाली. नेमका गॅस सिलेंडर संपला होता. कुकर चुलीवर कसा लावायचा? पण एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. पाणी गरम करून डाळ कुकर मध्ये शिजवून स्वयंपाकी ताईंनी घरून शिजवून आणण्याचं ठरलं. फोडणी मात्र चुलीवर द्यायची आणि भाजीही चुलीवर करायची ठरली. भाजी साठी रुंद प्लेट लागते, कारण ही भाजी चुरून आणि भुरका मारून खायची भाजी आहे. मुलांनी आदल्या दिवशी दिलेल्या सूचनेनुसार प्लेट आणल्या. सर्वांनी ठरल्या प्रमाणे पोळ्या शिल्लक आणलेल्या होत्या. 

काकड्या, टमाटे, कांदे छान चिरून वाढायला आणि फोडणी द्यायला कांदा लसूण पेस्ट मुली मुले यांच्या मदतीने आणि शिक्षिकेच्या निरीक्षणात करून घेतले. टोमॅटो प्युरी, वर्हाडी मसाला, मिरच्या आणि मसाले इत्यादी यांचे प्रमाण अंदाजे घेत तयारी पूर्ण केली. बाहेकर सरांनी जोरदार फोडणी दिली. शिजलेली डाळ आणि योग्य प्रमाणात पाणी टाकून भाजीला मस्त उकळी येऊ दिली. 

तोपर्यंत सगळ्यांनी रांगा करून कागदी पत्रावळी, प्लेट, भात, सलाद आणि इतर सगळं वाढून ठेवलं. मुलांनी आणि आम्हीही वाढलं. गप्पा मारत आणि आणलेल्या सगळ्या पोळ्या, भात अगदी तीन तीन वेळा भाजी घेऊन अगदी तृप्त होत जेवण सगळ्यांनी केलं. नंतर आम्हीही जेवलो. पुरुषाच्या हाताची वेगळी चव स्त्री शिक्षिकांना चाखायला मिळाली. जेवणानंतर सगळी आवराआवर करून मुलांना गप्पा मारायला पटांगणात बसवले. बैठे मजेदार खेळ, तोंडी गणित, आणि शेवटी स्वच्छता करून एक अविस्मरणीय दिवस साजरा करून सगळी घरी गेली. 

शाळा उपक्रमशील असणे ही केवळ विद्यार्थ्यांची गरज नसून ती एक शिक्षक म्हणून आपली सर्वांची मानसिक गरजही आहे हे आवर्जून जाणवले. शाळेतील वातावरणात चेतक बदल करण्याचं आणि चैतन्य निर्माण करण्याचं सामर्थ्य उपक्रमात आणि कृतीत असतं. शिक्षणाचे अनौपचारिक मार्ग बरेचदा वर्ग खोलीच्या बाहेर असतात. शिक्षक विद्यार्थी बंध घट्ट होण्याचे ते एक साधनच आहे. फक्त जाणीवपूर्वक त्यातून अध्ययन अनुभव कसे साधता येतील याची दृष्टी शिक्षक म्हणून कायम डोक्यात असली पाहिजे. 

शब्दांकन - संदीप विष्णू राऊत
raaut.sandip@gmail.com

Labels:

Thursday, October 5, 2023

शब्द लंगडी

#बोलगप्पा_दैनंदिनी 
लेख क्रमांक १२ 
शब्द लंगडी 

दोन अक्षर गट आणि त्यांना जोडून असलेले आ, इ ई, उ आणि ऊ स्वर चिन्हे एवढं झाल्यावर त्यापासून बनणारे ६०-७० शब्द, छोटी छोटी वाक्य यांचं वाचन मुलं हळूहळू करायला लागली आहेत. अक्षरांचे सुटे कार्ड आणि त्यांची स्वर चिन्हांशी सांगड घालून शब्द सहज बनवता येत आहेत याचा आनंद वेगळाच. बऱ्याच वेळा आपला समज होतो की जोपर्यंत सगळी मुळाक्षरे शिकून होत नाहीत तोपर्यंत स्वर चिन्हे घेऊच नयेत. वाक्य वाचायला देणे हे तर अशक्यच. 
पण कालचा अनुभव घेतला आणि लक्षात आलं की शिकण्याची प्रक्रिया समग्र असते. तिला सुटं सुटं करता येत नाही.

सर खेळायला चला न. वर्गात बोर झालं. हा नेहमीचा डायलॉग मला दुपारच्या सत्रात ऐकायला मिळतोच. साहजिक ही आहे, मुले एवढ्या वेळ एकाच बंदिस्त खोलीत कोंडणं हा एकप्रकारचा अन्यायच आहे त्यांच्यावर. तरीही वर्गात कबड्डी matress टाकलेल्या आहेत. जेणेकरून थोडी धिंगा मस्ती वर्गातही करता यावी. 

बाहेर खेळणं आणि आज झालेल्या भागाची उजळणी दोन्हीही उद्देश साध्य कसे करायचे या विचारात होतो. मग अचानक डोक्यात आलं की अक्षराचे व स्वर चिन्हांचे गोल आखावेत. त्याचा खेळ कसा करावा हे सुचत नव्हतं. बघू म्हटलं काहीतरी सुचेलच. बाहेर जायचं म्हटल्यावर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सवयीप्रमाणे मुलांनी रिंगण केले. पण यात गडबड झाली असती. अक्षरे सरळ दिसायला हवी होती. म्हणून पहिलीच्या मुलांना एका रेषेत बसवले. योगायोगाने दुसऱ्या वर्गाच्या शिक्षिकेला सुटी टाकून कुठेतरी जायचं असल्याने त्यांचा वर्ग ही सामील झाला.

दोन्ही वर्गांची एकाच खेळात गुंतवणूक करणं शक्य झालं नसतं. कारण त्यांची संपादणूक इयत्ता पहिली पेक्षा अधिक होती. मग त्यांना निरीक्षण करण्याचं काम दिलं. आणि पहिलीच्या खेळांनंतर याच प्रकारचा वेगळा खेळ खेळू असं आश्वासन दिलं. खेळ असा ठरला की मी एक शब्द सांगणार (जो या अक्षरांच्या संचात असेल) तो लिहायचा असेल तर कुठून कुठे जायचं हे लंगडी घालत दाखवायचं. जसं कमला असेल तर क + म + ल + काना (आ) 

मग काय कधी मी तर कधी मुलं त्या अक्षर वर्तुळांकडे बघून नवे नवे शब्द उच्चारत होतो, आणि लंगडी घालत क्रमाने ते बनवायला सांगत होतो. स्वर चिन्हांचा नेमका कुठे उपयोग करायचा हे मित्र मैत्रिणी मुळे मदत सुद्धा होत होती. खेळणारा सुद्धा व्यस्त होता आणि बघणारे सुद्धा व्यस्त होते. अनपेक्षितपणे खेळाचे नियम सुद्धा तयार झाले, खेळात बदल म्हणून वेगवेगळे पर्याय माझ्या डोक्यात आले. ही पद्धत इंग्रजी शब्दांसाठी सुद्धा वापरता येईल असं लक्षात आलं. 

पुढे पुढे मुलांनी स्वतः शब्द सांगायला सुरुवात केली आणि खेळाचे नियंत्रण स्वतः कडे घेतले. मुलांना खेळ, शारीरिक कृतींचा समावेश असलेल्या अध्ययन अनुभवात जास्त रस असतो. शिक्षक म्हणून आपल्याला ही समाधान मिळतं. 

- संदीप विष्णू राऊत
raaut.sandip@gmail.com

Labels: