Saturday, August 5, 2023

भोळा भाबडा वाढदिवस

#बोलगप्पा_दैनंदिनी 
क्रमांक 8
भोळा भाबडा वाढदिवस 

पोरांचे कान तिखट असतात, आपल्याला वाटतं आपलं लक्ष नाही, पण आपल्या संवादाकडे एक कान त्यांचा असतोच. मुख्याध्यापक मॅडम सोबत बोलताना सर सोमवारी, मंगळवारी शाळेत नाहीत हे सहावीच्या मुलींना कळलेच. 

काय सर, आम्ही एवढी तयारी केली. कुठलासा एक पुठ्याचा खोका पुढे करून त्यात जमा झालेल्या मळक्या नोटा, चिल्लर, चॉकलेट काहीबाही दाखवून मुली मुलं भांडायला आली. म्हटलं तुम्हाला कसं समजलं माझा वाढदिवस आहे ते? मागच्या वर्षी तनुष्काचा बड्डे 9 तारखेला होता आणि त्याच्या आधी तुमचा होता हे लक्षात आहे सर आमच्या. 

इयत्ता चौथी आणि पाचवी असे सलग दोन वर्षे या वर्गाशी खूप लळा लागला. वर्गात मुलींचाच भरणा अधिक, मुलं इन मीन चार आणि त्यात मुली डॉमिनंट असल्याने वर्गाची संपूर्ण सत्ता मुलींच्याच हातात असायची. शाळेतील सर्वाधिक पटाचा वर्ग आणि माझी बदली झाल्या झाल्या मिळालेला हा चुणचुणीत वर्ग. शिकवण्याची मजा आली.

बाळांनो, बरोबर आहे पण मला जावं लागणार आहे. आपण आल्यावर सेलिब्रेट करूया ना मस्त. आता मला एक महत्त्वाचा अहवाल करायचा आहे. शाळा सुटेल तासाभरात. करू द्या बरं काम. नाईलाजाने सगळ्यांना वर्गातून काढून दिलं. याद्या बनवण्याचा कामात गुंग झालो. मध्यान्ह भोजन सुटी झाली, आणि काही वेळाने सगळा ताफा वर्गात शिरला. हातातली कागदं बाजूला ठेवून माझा ताबा वर्गाने घेतला.

बड्डेच्या जुन्या खोक्यात काहीतरी आणलं होतं मुलांनी. सोबत पदवीधर सरांना, मुख्याध्यापिका मॅडम यांना सुद्धा बोलावण्यात आलं. अगदी थोड्याशा वेळात मुलांनी भोळ्या भाबड्या वाढदिवसाची तयारी केली. त्यात भर म्हणून वीज गेली. 

घरगुती कसलासा छोटेखानी केक, त्यावर चॉकलेट, गोळ्या यांच्या साहाय्याने केलेली डिझाईन. लाकडी चाकू, फुगे, कोरडा गुलाबजाम आणि टॉफी असा साग्रसंगीत कार्यक्रम. सर स्पेलिंग बरोबर आहे ना? 
संदीपच्या नावातच गडबड केली, ती दुरुस्त करून गेल्यावर हॅप्पी बर्थडे संदीप सर असं लिहिलं. मोबाईल घेऊन जल्लोष करत बर्थडे साजरा झाला.

हातांनी चॉकलेट, केक भरवताना त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते. वर्गशिक्षक नसताना ही त्यांच्या डोळ्यात दिसणारा जिव्हाळा, प्रेम बघण्यासारखं होतं. भोळा भाबडा केक बनवताना किती मुलांनी त्याला हात लावला असेल, स्वच्छता असेल की नाही. गावातील हे केक किती गुणवत्तेचे असतील, यातलं काहीही मनात आलं नाही. 

त्यांच्या हातानं केक खाताना डोळे नकळत आद्र झाले होते. काही वाढदिवस खरंच खास असतात. 

लेखन - संदीप विष्णू राऊत (प्राथमिक शिक्षक)
raaut.sandip@gmail.com

Labels: , , ,

Thursday, July 27, 2023

पेट्याच पेट्या

#बोलगप्पा_दैनंदिनी 
क्रमांक 7
पेट्याच पेट्या 
दरवर्षी शाळेला काहीना काही साहित्य प्राप्त होत असतं. त्यात शैक्षणिक साहित्य साधने असतात तर कधी विविध प्रशिक्षणाच्या पुस्तिका असतात. नियमाप्रमाणे प्राप्त साहित्याच्या रेकॉर्ड वर घेऊन त्याची नोंद व्यवस्थित केल्या जाते. नवीन नवीन असेपर्यंत काही दिवस वापरले जाते आणि मग अडगळीत पडते.

आज शाळेतील सगळ्या पेट्या उघडायच्या. जुन्या नव्या सगळ्यांना उघडून त्यातील साहित्याची नीट व्यवस्था लावायची.

मी प्रस्ताव दिला, मुख्याध्यापकांनी लगेच मान्य केला. साहित्य कोणकोणते आहे याची वर्गवारी आणि व्यवस्थित यादी करा सर. मुख्याध्यापकांनी सूचना दिली. मग काय सर्व सहकारी मंडळींना घेऊन बाहेर पटांगणात मोठी सतरंजी टाकली, सोबत दोन मुले मदतीला घेतली. मांडी घालून सगळ्या पेट्या बाहेर काढल्या.

खिडकीतून पहिलीची मुलं डोकावून बघत होतीच. जादूची पेटी काढून गुरुजी काहीतरी मजेदार बघत आहेत. आपल्याला मात्र दाखवत नाहीत. असं काहीसं वाटत असावं. काहीतरी बहाण्याने मुलं हळूहळू भोवताली जमा झालीच. 

एक एक साहित्य काढून त्याची नोंद घेतली. त्यावरील माहिती पुस्तिकेत वाचून सगळ्यांनी समजून घेतली. जिथे वाचून कळले नाही तिथे qr कोड स्कॅन करुन व्हिडिओ बघून समजून घेतले. खरंच किती दर्जेदार आणि उपयुक्त साहित्य पेट्यांमध्ये बंदिस्त होऊन राहतं.
एक बाब प्रकर्षाने जाणवली, साहित्य जरी विशिष्ट घटकांसाठी बनवलेले असले तरीही त्याचा वापर असंख्य प्रकाराने करता येतो. बघता बघता आम्ही सर्वजण याचं काय काय करता येईल यावर गुंग होऊन चर्चा करत होतो.

साहित्य सुटे सुटे करून वाटल्याने त्याची एकसंघता निघून जाते. नंतर त्याची संगती लागत नाही. म्हणून आम्ही लायब्ररी सिस्टीम ने एकाकडे साहित्याचा चार्ज देऊन गरजे नुसार साहित्य नोंदवून वापरायचं ठरवलं.
यातून सर्व वर्गांना सर्व साहित्य वापरायला मिळते आणि साहित्य organise करून राहतं.

हे त्रिमितीय आकार दुसऱ्या वर्गाच्या कामाचे आहे सर.

नाही नाही हे घनफळ आणि पृष्ठ फळाचे साहित्य आहे, आमच्या वर्गाला उपयोगाचे आहे.

नाही नाही सर याचा उपयोग चित्रकलेच्या तासाला सुद्धा करता येणार आहे.

असा संवाद सारखा कानावर येत होता. गंमत सांगू का कोणतंही शैक्षणिक साहित्य कुणा वर्गाचं नसतंच. कारण जेवढी अधिक सृजनशीलता लावाल तितक्या पद्धतीने साहित्य वापरल्या जाऊ शकतं.
उदाहरण म्हणून बघा. हे त्रिमितीय आकार ओळख म्हणून छोट्या वर्गाला उपयोगाचे आहे, त्यात पाणी भरलं तर घनफळाची सूत्रे उलगडायला वरच्या वर्गाला उपयोगाचे आहे. घनता, पृष्ठफळ याशिवाय, कार्यानुभव, कलेच्या तासाला रेखाटन करायला त्याचा उपयोग करता येईल. 

शेवटी काय ही नमुना म्हणून दिलेली साहित्य आहेत, आपल्या आजूबाजूला बघितलं तर साहित्यच साहित्य दडलेले आहे. शिक्षक सृजनशील असेल तर वर्तमानपत्राची ही रद्दी सुद्धा साहित्याची खाणच आहे. 

जुन्या नव्या सहित्यांना पुन्हा व्यवस्थित लावत शिक्षणाच्या वाटा सोप्या करण्याचा प्रयत्न सुरू झालाय. 

(आपण काय काय करता? 
शैक्षणिक साहित्य वापरण्याचा खरंच उपयोग होतो का? यातील मुख्य अडचणी कोणत्या येतात? आवर्जून प्रतिसाद द्या.)

लेखन - संदीप विष्णू राऊत (प्राथमिक शिक्षक)
raaut.sandip@gmail.com
(नव्या पेटीतील tangram च्या साहाय्याने मुलांनी लावलेले नवे शोध फोटोत नोंदवले आहेत.)

Labels: , ,

Saturday, July 22, 2023

बोलगप्पा_दैनंदिनी 6 धुळपाटी आणि काडी चित्र

#बोलगप्पा_दैनंदिनी 
क्रमांक 6
धुळपाटी आणि काडी चित्र

छोट्या दोस्तांना खेळ, मस्ती आणि शारीरिक हालचाली ह्या सतत हव्या असतात. मारून मुटकून बसवलं, तोंडावर बोट अन् हाताची घडी केली तर काहीवेळ आपल्याला शांतता मिळाली असं वाटणं हा गोड गैरसमज आहे. खरं तर ते अमानवी सुद्धा आहे. ज्यांचे चयापचय एवढे क्रियाशील आहे अशा छोट्या मुलांना तासनतास एका बेंचवर बसवणं जरा अन्यायकारकच.

त्यासाठी मी डेस्क बेंच भिंतीला टेकून अगदी मोजके c आकारात लावून ठेवले. मध्ये एक मोठी पट्टी कायम स्वरुपी ठेवली. जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा मुलं तिथे झोपून, कशी रेलून, कधी मांडी घालून मस्त लिहितात. घोळका करून गप्पा करतात. दोघांचे गट, तीन चार जणांच्या गटात छोट्या छोट्या कृती करत शिकणं मजेदार होतं.

वेगवेगळ्या रंगांची रांगोळी आणि बाजारात स्वस्त मिळणारे पाटीच्या पेक्षा जरा मोठ्या आकाराचे प्लास्टिक ट्रे वापरून धुळपाटी बनवली. त्यात दोन इंच जाडीची रांगोळी पसरली. दोघांत एक एवढ्या प्रमाणात धूळ पाट्या गिरवायला दिल्या. रांगोळी सांडणार नाही, कपडे मळणार नाही यासाठी जमिनीवर ठेवायला आणि उलट्या पेन्सिलने गिरवायला सांगितले. पहिल्या दिवशी हवं ते गिरवायला संधी दिली. 

जरा सांडा-सांडी, भांडा भांडी झालीच. मला आवडता रंग हवा म्हणून खेचा खेची झालीच. पण नंतर चक्क तासभर मुलं तल्लीन होऊन मनसोक्त काहीबाही गिरवत होते. कुणी ABCD तर कुणी अंक सुद्धा नकळत गिरवले. माझं बघा म्हणताना पाटी सारखी उचलून धरली, ती सांडू नये यासाठी बरीच कसरत करावी लागली. शेवटी त्यांना सवय झाली. पीठ, माती, बारीक वाळू सुद्धा वापरायला हरकत नाही.

आईस्क्रीम काड्या हा स्वस्त आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध होणारे साधन. मोजायला म्हणून सगळ्यांना न मोजता हाती येतील तेवढ्या दिल्या. काहींनी मोजलं काहींना कसं मोजावं तेच सुचेना. 
एक दोन तीन पाच दहा बारा…असं क्रम चुकवत कुणी मोजत होतं. कुणी क्रम बरोबर पण बोटं घाईघाईने पुढे घेत मोजत होतं. 
एकाचं या गोष्टीत लक्षच नव्हतं. त्याने काड्या जोडून कसलातरी आकार बनवायला घेतलेला.

मला क्लिक झालं, काड्या जोडून काहीतरी आकार बनवण्यात मुलांना जास्त आनंद. मी त्यांना म्हटलं तुम्हाला आवडेल तो आकार बनवा. कुणी घर, कुणी पाटी, कुणी सूर्य, कुणी रस्ता, रेल्वे रूळ, गाडी..अबब….इतके सारे आकार. काहींना काड्या कमी पडायला लागल्या, मी म्हटलं दोघांनी एकत्र करून बनवा. मग तर कल्पनेला भरारी मिळाली.

तरीही रूद्र चं समाधान होत नव्हतं. 

"सर मले लय काड्या पाहिजे." 

मी मग ठरवलं, ज्याला जेवढ्या काड्या लागतील तेवढ्या द्यायच्या. सगळ्यांना थांबवून मी अख्खा काड्यांच्या ट्रे त्याच्या हवाली केला.
पुढचे पंधरा मिनिट रुद्रने मोठी रचना बनवली.

"सर हा आपल्या शाळेजवळ चा मोठ्ठा रस्ता आहे. "

कुणी बिल्डिंग, कुणी फुलांची डिझाईन, कुणी माणूस, कुणी अगम्य अगम्य असं काहीबाही बनवलं. त्यांच्या नजरेनं अर्थपूर्ण असल्याने मी संयम बाळगून त्यांना बोलू दिलं. नवनिर्मिती साठी मुलांना काहीही साधन चालतं.

आपण शैक्षणिक साहित्य म्हणून जो उद्देश ठेवतो, तोच आणि तसाच त्याचा उपयोग होईल असं नसतं. एकाच साधनाचा गरजेनुरूप लवचिक उपयोग करून ठरवलेला घटक, आणि न ठरवलेला घटकही घ्यावा लागतो. 

संदीप विष्णू राऊत ( प्राथमिक शिक्षक)
raaut.sandip@gmail.com 
( आपल्या वर्गातील अशाच काही मजेदार कृती असतील तर आवर्जून शेअर करा.)

Labels: , , ,