दातात अडकून पडलेला मी
#हलकं_फुलकं
कुणी मृत्यूच्या दाढेत अडकून पडलं, कुणाच्या दाढेतून कुणाची सुटका झाली. अशी वाक्य आपण नेहमी ऐकतो, पण स्वतःच्या दातात अडकून पडल्याचं ऐकलं आहे कधी?
त्याचं असं झालं की मी माझ्या कामावर होतो. काम करताना सहकारी ताईने मस्त चिवडा, फरसाण खायला दिले. खाऊन झाले, पाणी पिऊन झाले आणि मी माझ्या कामात व्यस्त झालो. काम करता करता मागच्या दाढेमध्ये काहीतरी अडकलं याची जाणीव झाली. तोंड अंतर्गत मामला शक्यतो तोंडातर्गत विभागात सोडवायची सवय असल्याने जिभेने तो कण काढण्याचे प्रयत्न सुरू केले. वरच्या भागातून तर कधी खालच्या भागातून जिभेने अतोनात प्रयत्न करून दाढेतल्या कणाला काढण्याचा प्रयत्न केला. दाढेला समजत होतं नेमका कण कुठे आहे, पण जिभेच्या हाताशी काही लागत नव्हतं. तोंड वेडंवाकडं करून खूप प्रकारे जिभेने प्रयत्न करून जीभ लालेलाल झाली.
कामात लक्ष लागेना. एवढासा काय तो कण, त्याची काय बिशाद. असा अहंकार उफाळून आल्याने, तोंड विभागाचे काम बोट विभागाकडे सुपूर्द झाले. बोटांनी इमाने इतबारे नेमक्या कुठल्या दाढेत कण अडकून पडला आहे याची सखोल चौकशी करायला सुरुवात केली. दाढ विभागाला कळत होतं की नेमकं दुखणं कुठे आहे पण बोट विभागला ते नीट सांगता येत नव्हतं. मेंदूचा प्रयत्न जोरदार सुरू होता अचूक दिशा निर्देश करण्याचा पण दोन विभागात ताळमेळ बसत नव्हता. बोटांनी हाताळलं की तिथे काहीच लागत नव्हतं, पण दाढ सारखी म्हणत होती काहीतरी अडकलं आहे हे निश्चित.
त्यात काय एवढं, निघेल हळू हळू म्हणून हात विभागाने चालढकल केली. पण दाढेला कुठं कळतंय, तिला सतत टोचणी लागलेली होतीच. लिहायला घेतलं तर हातातल्या पेनाच्या अनुकुचीदार टोकामध्ये कण काढायची उर्मी निर्माण झाली. मग काय खटका दाबून शक्य तेवढ्या आत पेन घालून दाढेच्या कणावर आक्रमण सुरू केलं. पण तोंडाला काळी शाई आणि जिभेला तुरट कडवट चव लागणे सोडले तर हाती काही लागलं नाही. या प्रयत्नात आजूबाजूच्या सहकाऱ्यांनी याचं काहीतरी बिनसलं आहे की काय, की डोक्यात फरक पडला की काय असं समजून माझ्याकडे बघायला सुरुवात केलेली होती.
त्यांच्या नजरा चोरत उगाच काहीतरी निमित्त काढून मी बाहेर पडलो. कण खरं म्हणजे दातात कमी डोक्यात जास्त अडकून पडला होता. बाहेर कडुनिंबाचे झाड दिसले. डोक्यात प्रकाश पडला. त्यातली वाळलेली फांदी पाहून त्याची टोकदार काडी तोडली. नैसर्गिक टूथपिक वापरले पाहिजे. त्यात कुठलं तरी व्हिटॅमिन झी का काय असतं म्हणे. त्यामुळे दातात कीड राहत नाही आणि दातही स्वच्छ होतात. कडुनिंबाच्या काडीचे फायदे अशी डोक्यात काडी वळवळली. मस्त पैकी त्या काडीने बाकीच्या फटीतला सगळं प्लाक काढला. दाढेत नेमका कण शोधून काढण्याच्या प्रयत्नात काडी मोडली. मला जरा रागच आला. एवढी काय ती मिजास या कणाची. माझं धारदार हत्यार चक्क मोडलं. दुसरी काडी तोडायला गेलो तोवर लक्षात आलं की निंबाच्या काडीचा एक बारीक तुकडा सुद्धा त्याच दाढेत अडकून बसला आहे.
आता एका समस्येबाबत दुसरी समस्या निर्माण झाली. आता त्या कणाचं फारसं दुःख वाटेनासं झालं, पण आपणच अडकवलेली की केलेली म्हणा हवं तर काडी कशी काढायची यावर गहन चिंतन सुरू झालं. आपली रणनीती मुळात चुकली हे उशिरा लक्षात आलं. दातात अडकलेले कण काढायला अतिशय मजबूत हत्यार पाहिजे. महिला भगिनिकडे हमखास असणारी गोष्ट म्हणजे सेफ्टी पिन. ताईंना अदबीने माझी अडचण सांगून एक सेफ्टी पिन मागवली. पोटभर पाणी पिऊन आणि समोरच्या कामाला बाजूला सारून मोठ्या आत्मविश्वासाने खुर्चीवर बसून मी सेफ्टी पिनाने दातातला अन्नकण काढायला सुरुवात केली. वेगवेगळया दिशेने प्रयत्न केल्याने यश हमखास वैगेरे लाभते असं कुणीतरी सांगून वैगेरे ठेवलं आहे म्हणतात. तसं मी चित्त एकाग्र करून डोळे बंद करून समाधिस्त अवस्थेत अन्नकण काढायला भिडलो. हाताशी लागलं म्हणता म्हणता यश हुलकावणी घालत होतं. कणाच्या आजूबाजूला दाढ खरवडून झाली, पण बच्चम जी खोलवर रुतून बसलेला होता.
दातात कसली तरी वेगळीच चव लागायला लागली. मी जरा घाबरलो, म्हटलं रक्त वैगेरे तर नाही? हो त्या पिनेने टोचून टोचून हिरड्या मधून रक्त यायला लागलं होतं. मी सगळा खटाटोप बाजूला ठेवला, आधी नळावर जावून गुळण्या करायला सुरुवात केली. हा अघोरी उपाय करणे चुकले हे लक्षात यायला लागले होते. एव्हाना घरी निघण्याची वेळ झाली होती. अर्धवट सोडून मी काम निपटायला घेतली. अर्थात डोक्यातली टक जाता जात नव्हती. फायबर शरीराला आवश्यक असतात म्हणे, डोंबलाचा….
हा कसला फायबर दाताच्या फटीत अडकून पडला कोण जाणे.
आरश्यासमोर उभे राहून वेड वाकडं तोंड करून कधी जिभेने, कधी बोटाने, तर कधी मोबाईलच्या उजेडात समस्या नेमकी कुठे दडून बसली आहे याचा शोध घेणे सुरू केले. दात खूप पिवळे दिसतात आपले. पांढरे शुभ्र होण्यासाठी आयुर्वेदिक आणि कसल्या भारी ब्रँडचा पेस्ट आणून बघितला. पण आपले पिवळे दात दिसायचे कुठले थांबायचे. रोज झोपण्या आधी आणि सकाळी उठल्यावर दात स्वच्छ धुतले पाहिजे, याची आठवण झाली. डॉक्टर सुद्धा झोपण्याआधी दात स्वच्छ धुवून झोपत असतील का? भोळा भाबडा प्रश्न मलाही पडला. यूट्यूब वर दातातील कण कसा काढायचा यावर व्हिडिओ बघितला. त्यातल्या काही gadget ची नाव नोंदवून घेतली. दोरीने हळूच दाताच्या फटीतला कण काढायची युक्ती मला जाम आवडली. आपण उगाच श्रम घेतले.
छान पांढऱ्या शुभ्र धाग्यातील बिंडल मधला तुकडा घेऊन आरश्यासमोर उभे राहून मी प्रयोगाला सुरुवात केली. अधेमधे बायको पोरं पप्पा हे काय विचित्र करत आहेत, म्हणून हसत बघत होती. पण मी गंभीर असल्याने, कुणी छेडायला तयार नव्हतं. धागा आत घुसला आणि हाय देवा…तुटला आणि त्याचा एक तुकडा त्याच दाढेत अडकून पडला. माझी चिडचिड झाली. सगळा राग त्या बिंडलावर काढून, आजकाल भ्रष्टाचार किती खोल रुजला आहे यावर बायकोला एक लेकचर वैगेरे देऊन टाकले. धागे मजबूत कसे असायला हवे यावर माझे मत वैगेरे नोंदवले. बायको जवळ येऊन हळूच म्हणाली, अहो एवढं डोकं लावत बसण्यापेक्षा डेंटिस्ट कडे जावून या ना. उगाच इजा करून घ्याल.
स्वतःच्या गळून पडलेल्या अहंकाराने मलूल होऊन मी नाईलाजाने डेंटिस्ट कडे जाण्याचा निर्णय घेतला. कॉल करून अपॉइंटमेंट घेतली. तिथे ही तोबा गर्दी. माझा नंबर यायला तासभर तरी अवकाश होता. धागा, काडी आणि बहाद्दर अन्नकण तिघांच्या युतीने मी नामोहरम झालेला होतो. अशावेळी वाट बघायची वेळ युगांसरखी का भासू लागते माहित नाही. म्हातारे, तरुण, स्त्री पुरुष सगळ्यांचे काहीना काहीतरी प्रोब्लेम. त्यांच्या दुःखाच्या पुढे आपलं दुःख किती क्षुद्र आहे याची आध्यात्मिक जाणीव वैगेरे मला व्हायला लागली. दुःखाकडे बघताना आपण आजूबाजूला असलेल्या सुखाकडे कानाडोळा वैगेरे करतो. आयुष्य क्षण भंगुर वैगेरे वैगेरे आहे याची प्रखर जाणीव मला व्हायला लागली.
दोन पेशंट राहिले, एवढा काय वेळ लागतो डॉक्टरांना. प्रत्येकाला एवढं काळजीपूर्वक तपासतात. काही गरज नसते, असे स्वार्थी वैगरे विचार डोक्याला यायला लागले. एखादा पेशंट कमी झाला असता तर किमान दहा मिनिटे वाचले असते. वैगेरे वैगेरे…माझं नाव यायचंच. एवढ्यात चमत्कार झाला. लाळ पिऊन पिऊन का काय माहित पण अन्नकण फुगून बाहेर पडला. अर्थात त्यामुळे फट जरा मोठी होऊन धागा काडी हळूच जिभेने बाहेर निघाली. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदचि अंग आनंदाचे
एवढा आनंद मला लग्न झाल्यावर सुद्धा झाला नव्हता. डॉक्टरांकडे जाण्याचे पैसे वाचले होते. लगेच रांगेतून बाहेर येत. मी गाडीला किक मारली. रस्त्याने डोक्यात आलं, खरंच सगळ्या समस्या सोडवत बसलं पाहिजे असं नाही. काही समस्या वेळ काळ आला की आपोआप सुटतात. आपण आपल्या डोक्यात सुद्धा असाच एखादा कण अडकून ठेवतो. असे महान वैगेरे विचार डोक्यात घेऊन घरी आलो.
जेवण करताना बायकोला सगळा किस्सा आनंदाने सांगत बसलो. जेवण झालं. बेडवर अंग टाकलं, आणि घात झाला…आजच्या भाजीतला पालक फायबर नेमका तिथेच अडकून बसला…..!!
शब्दांकन - संदीप विष्णू राऊत
२२.११.२०२३
raaut.sandip@gmail.com
Labels: मराठी, ललित, लेख