#बोलगप्पा_दैनंदिनी क्रमांक १० वर्गात चोर शिरला
#बोलगप्पा_दैनंदिनी
क्रमांक १०
वर्गात चोर शिरला
आमच्या टीम पैकी चार जण आज गावामध्ये माहिती गोळा करण्यासाठी बाहेर गेलेली होती आणि दोघं शाळेत थांबलेली होती. साहजिकच अशावेळी वर्ग नियंत्रण अवघड असतं. त्यामुळे पदवीधर सरांनी तीन वर्ग एकत्र करून शाळेच्या स्मार्ट टिव्ही वर शैक्षणिक व्हिडिओ लावून मुलांना गुंतवून ठेवले. शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम यांनी इतर वर्गांना मोकळ्या मैदानात बसवून सामूहिक उपक्रम राबविले.
जसा मी गावातून शाळेत पोहचलो, इयत्ता पहिलीच्या मुलांनी एकच गलका केला…" वर्गात चोरी झाली" सगळी मुलं तावातावाने मला प्रत्येकाचा रिकामा झालेला कंपास आणून दाखवायला लागले.
" सर आमच्या दप्तरातलं सगळं चोरलं, काहीच ठेवलं नाही."
रडवेले चेहरे करून काही मुलं मला हात धरून धरून सांगायला लागले.
काहीवेळ मी स्तब्ध झालो. आता हे काय नवेच…
दप्तर बघितले का?
हो सर, पहिलीच्या वर्गाचे सगळे दप्तर बघितले. आमच्या वर्गाची कॅप्टन बोलत होती. सगळी कागदं वैगेरे ठेवून मी बाहेर बसलेल्या मुलांच्या समुहा पुढे खुर्ची टाकून बसलो. लहान मुलांनी नक्कीच चोरी केली नसेल, हे कुठल्या तरी मोठ्या मुलांचे काम असणार, असा प्राथमिक अंदाज बांधून मी चौकशी सुरू केली.
सगळी मुलं व्यस्त असताना पहिलीच्या वर्गात चोरी झालीच कशी? शाळेवर असणाऱ्या शिक्षकांना ही संभ्रम पडला. मॅडमने पहिलीच्या कॅप्टनला पाठवून सगळी दप्तरं बघायला लावलेली होती. चौकशी करताना लक्षात आलं की चौथा वर्ग व्हरांड्यात बसलेला होता, तो सगळ्यात जवळ असल्याने नजर चुकवून त्यातल्या एखाद्याने ही करामत केलेली असू शकते. सगळ्यांना रांगेत बसवून मी सहावीच्या मुलींना वर्गाची झडती घ्यायला पाठवले. सगळ्यांची दप्तरे बघून सुद्धा काहीही सापडले नाही.
सर तो आठवीचा अमुक तमुक नेहमी पेन चोरतो…ती नेहमी वह्या इकडच्या तिकडे करते….सर ह्याच दप्तर पहा…नाही सर सातव्या वर्गातले पोरं कोणाच्या बी वर्गात घुसतात……नुसता गलका झाला. मला काय करावे सुचेना. मी सर्वांना शांत केले आणि सगळ्या शाळेच्या मुलांचे दप्तर बघणार असं फर्मान काढलं. सगळी धुसफूस करायला लागली.
पहिल्या वर्गातला +++ हळूच उठला आणि माझ्या कानाजवळ येऊन बोलला. " सर चौथीच्या वर्गातला अमुक मुलगा एकटाच वर्गात गेला होता. मी त्याला बोलावले. आधी तो कुठेच गेला नाही असं म्हणत होता. दोन चार मुलांनी दुजोरा दिल्यावर त्याने गेल्याचे मान्य केले. पण तिच्या बहिणीची बॉटल आणायला गेल्याचं सांगितलं. म्हणजे याने काहीच केलेलं नव्हतं.
निष्कर्ष निघेना. सी आय डी केस सारखी परिस्थिती झाली.
"सर आशिष ने चोरलं असंल. तो नेहमीच पेन्सिली चोरतो."
पण त्याच्या दप्तरात काहीच सापडलं नव्हतं.
मला आतून असं वाटलं की पुन्हा एकदा पहिलीच्या वर्गाची दप्तरे बघावी. सहावीच्या दोन मुलींना पुन्हा सगळी दप्तरे बघायला पाठवलं. अर्थात मुलं वर्गाबाहेर काढलेली होतीच.
मुलगी एक दप्तर घेऊन आली…सर याच्यात खूप साऱ्या पेन्सिली, खोडरबर सापडले. पहिलीच्या ××× च्या दप्तरात सगळा खजिना सापडला होता. कुणाचे डस्टर, कुणाचे स्केचपेन, कुणाच्या लेखना आणि काही बाही बरंच…
वर्गातली ही हुशार मुलगी, कसं काय केलं असेल? तिला रडू आलं. तिच्या मोठ्या बहिणीला खूप राग आला, तिने समोरच येऊन धपाटा घातला, खूप चिडून बोलायला लागली. मी तिला शांत केलं, अरे अजून सगळं कळू तर दे. काय झालं कसं झालं? तिला जराही न रागावता मी जवळ घेतलं.
" सर …..ही म्हणे आपण गंमत करू, हिने मला म्हटलं म्हणून मी केलं."
आमच्या वर्गाची कॅप्टन सुद्धा यात सामील होती तर.
"सर ही ….सुद्धा आमच्या सोबत होती…"
वर्गातल्या तीन हुशार मुली यात सामील होत्या. खरी गंमत पुढे होती. त्यांनी सगळ्या वस्तू गोळा केल्या. पण जेव्हा दप्तर तपासायला गेल्या तेव्हा काहीच सापडलं नाही असं सांगितलं.
चोरी करणे एवढा गंभीर प्रकार मुलांच्या डोक्यात नसतो. एखादी वस्तू आपल्याकडे नाही, ती असावी ही बालसुलभ भावना त्यांना नकळत वस्तू चोरायला प्रवृत्त करते. त्यात फक्त गंमत म्हणून सगळ्यांचे कंपास खाली करण्याचा हा प्रकार अंगलट आला असता. वयाचा विचार करता, त्यांना चोर म्हणणं, शिक्षा करणं आणि सर्वांसमोर अपमान करणं योग्य वाटलं नाही. त्या ऐवजी वर्गात बसवून सगळ्यांना जवळ घेऊन समजावून सांगितलं. असं करणं चुकीचं आहे, चोरी केल्यानं आपला वर्ग आणि आपले शिक्षक यांना कुणी वाईट म्हणेल. तुम्हाला चोर म्हटलेलं आवडेल का? भावनिक होऊन त्यांनी चूक मान्य केली. कान धरून शपथ घेतली.
पूर्वग्रह ठेवून थेट आरोप करणे टाळले पाहिजे. वस्तू संग्रह करणे हे अगदीच बालसुलभ असतं. मनावर चरे न पडू देता चूक लक्षात आणून दिली पाहिजे, असं मला वाटतं. पण मी सुद्धा ही चूक केली होती.
एक कागदी खोका वर्गाच्या टेबलावर ठेवला. इथून पुढे जे सापडलं ते या डब्यात टाकायचं. ज्याला वाटेल ते आपलं आहे त्याने मला सांगून घ्यावं. बघुया पुढे काय काय होतं.
लेखन - संदीप विष्णू राऊत (प्राथमिक शिक्षक)
raaut.sandip@gmail.com
